– ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला लावणार हजेरी
बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ११ किंवा १३ ऑगस्टरोजी मेहकर येथे येत असून, ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाला ते हजेरी लावणार आहेत. यासंदर्भात प्रशासन कामाला लागले असून, जिल्हाधिकारी ड़ॉ.ह. पी. तुम्मोड़ यांनी मेहकर येथे ३ ऑगस्टरोजी अधिकारी व कर्मचारी यांची बैठकदेखील घेतली असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम म्हणून नावारूपास आलेला ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे मेहकर येथे आ. ड़ॉ. संजय रायमुलकर यांच्या पुढाकाराने आयोजन केले असल्याची माहिती असून, हा कार्यक्रम ११ किंवा १३ ऑगस्टरोजी होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील ड़झनभर मंत्री, खा. प्रतापराव जाधव, जिल्ह्यातील आमदारांसह अधिकारी व मान्यवरदेखील उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, यासंदर्भात जिल्हाधिकारी ड़ॉ.ह.पि. तुम्मोड़ यांनी मेहकरात काल, ३ ऑगस्टरोजी अधिकारी व कर्मचार्यांची बैठक घेऊन कार्यक्रम नियोजनबध्द व चांगल्या पध्दतीने पार पाड़ण्यासाठी संबंधितांना अवश्यक सूचना देऊन कामाची जबाबदारीदेखील वाटून दिल्याची माहिती आहे. सदर बैठकीला तहसीलदार नीलेश मड़के यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
शिवसेनेत बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट वेगळा झाला. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री नसताना आ.ड़ॉ.संजय रायमुलकर यांच्या मुलीच्या विवाहासाठी गेल्यावर्षी मेहकरात हजेरी लावली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री पहिल्यांदाच ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने मेहकरात येत आहेत. यासाठी प्रशासनदेखील कामाला लागले असून, खा. प्रतापराव जाधव, आ. ड़ॉ. संजय रायमुलकर यांनीही संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. सर्व प्रशासकीय तयारीवर हे नेते घरचे लग्नकार्य समजून जातीने लक्ष ठेवून आहेत.