बुलढाणा (गणेश निकम) – बुलढाणा जिल्हा मातृतीर्थ जिजाऊंचा जिल्हा आहे. या जिल्ह्याची जबाबदारी एका महिलेवर देऊन आमचे नेते शरद पवार साहेबांनी मोठा विश्वास दाखला आहे. हा विश्वास सार्थ करण्यासाठी सोबत असणार्या मावळ्यांना घेऊन ‘शिवरायांसारखे’ लढणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा तथा माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी ठणकावून सांगितले. राष्ट्रवादी भवन बुलढाणा येथे आज पक्षाची जिल्हा बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेतून त्यांनी आगामी रूपरेषा स्पष्ट केली.
रेखाताई खेडेकर म्हणाल्या, की आज आम्ही जिल्हा बैठक घेतली आहे. यानंतर तालुकास्तरावर ग्राम बैठका घेतल्या जाणार आहेत. अनेक लोक सोबत येण्यास तयार आहेत. कोण सोडून गेला याची चर्चा आम्ही करणार नाही. आमचा पक्ष हा सुसंस्कृत पक्ष आहे. टीका टिप्पणीत वेळ घालविण्यापेक्षा आम्ही आमच्या पक्षाचा एजेंडा राबवणार आहोत. सोबत असणारे मावळे घेऊन आम्ही शिवरायांसारखे स्वराज्य उभारण्यासाठी निघाल्याचे त्यांनी सांगितले. नवीन लोकांना सोबत घेऊन पक्ष वाढवणावर भर देणार असल्याचे त्या म्हणाल्या.
कार्यकर्ते शरद पवारांसोबत – प्रसेनजीत पाटील
राज्यात जे काही होत आहे ते जनता पाहत आहे. लोकांना हे रुचले नाही. कार्यकर्त्यांना आजही शरद पवार हेच जवळचे वाटत असून, पवार साहेबांसोबतच कार्यकर्ते आहेत. त्यामुळे पक्ष वाढवण्यासाठी फारशी अडचण नाही. आम्ही ताकतीने पक्ष उभा करणार असल्याचे पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटील यांनी सांगितले. तर घाटावरील कार्याध्यक्ष नरेश शेळके यांनी तरुणांनी राष्ट्रवादीत सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ, बीटी जाधव, पीएम जाधव, तालुकाध्यक्ष दीपक मस्के, अॅडवोकेट काळवाघे, पवन मेहंगे, प्रभाकर काळवाघे, तुळशीराम काळे आदि उपस्थित होते.