Breaking newsHead linesMaharashtraVidharbha

राजू शेट्टींशी डोकं लावल्यापेक्षा आमच्याकडे या; शेतकरी नेते रविकांत तुपकरांना भाजपची ‘ऑफर’!

– भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही तुपकरांशी चर्चा!!

मुंबई (खास प्रतिनिधी) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी पराकोटीचे मतभेद झाल्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी संघटनाच ताब्यात घेतली आहे. शेट्टी हे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तुपकरांनी केला होता. त्यानंतर तुपकर यांच्यासारख्या शेतकर्‍यांत लोकप्रिय नेत्याला भाजपमध्ये घेण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, आज तशी अधिकृत ऑफर तुपकरांना देण्यात आली आहे. तुपकर यांनी बहुजन नेत्याचे खच्चीकरण करणार्‍या नेत्यासोबत राहण्यापेक्षा व संघटनेवर दावा सांगण्यापेक्षा भाजपमध्ये यावे, असे आवाहन भाजपच्या ओबीसी सेलचे राज्य समन्वयक, तसेच भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय डॉ. आशीष देशमुख यांनी केलेले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीदेखील रविकांत तुपकरांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे खच्चीकरण करत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील एका सामान्य कार्यकर्त्याला उगीच हवा देऊन ते तुपकरांना जिल्ह्यातच रखडविण्याचा उपदव्याप करत होते. एवढेच नाही तर संघटनेत राज्यभर तुपकरांचे नेतृत्व मानणारा मोठा घटक आहे. या सर्व नेत्यांचेही ते खच्चीकरण करत होते. शेट्टी यांचे हे उपदव्याप म्हणजे, संघटना अडचणीत आणण्याचे धंदे असल्याने रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी राजू शेट्टी यांनाच साईडलाईन करत, संघटनेवरच दावा सांगितला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील ही यादवी पाहाता, रविकांत तुपकर यांच्यासारखा आक्रमक, तरूण, अभ्यासू व लोकप्रिय शेतकरी नेता भाजपात घेण्यासाठी भाजप नेतृत्वाने कंबर कसली आहे.
भाजपच्या राज्य ओबीसीचे सेलचे समन्वयक डॉ. आशीष देशमुख यांनी रविकांत तुपकर यांना भाजपात यावे, अशी ऑफर दिली आहे. ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेत खदखद दिसून येत आहे. शेतकरी बहुजन नेत्यांवर अन्याय होत आहे. रविकांत तुपकर यांनी त्यांच्या पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे रविकांत तुपकर यांनी पक्ष संघटनेवर दावा करण्यापेक्षा भाजपमध्ये यावे, आम्ही त्यांचे स्वागत करण्यासाठी तयार आहोत,’ असे डॉ. आशीष देशमुख म्हणालेत. दरम्यान, काल भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील तुपकरांना भ्रमणध्वनी करून त्यांच्याशी चर्चा केली. या दोन नेत्यांतील चर्चेचा तपशील कळू शकला नसला तरी, आपण भाजपात यावे, आपले योग्य ते राजकीय पुनर्वसन केले जाईल, अशा शब्द फडणवीस यांनी तुपकरांना दिला असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे.


‘खासदारकी’चे तिकीट मिळाल्यास रविकांत तुपकर भाजपमध्ये जाण्यास तयार!

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून खासदारकीचे तिकीट मिळाले तर शेतकरी नेते रविकांत तुपकर हे भाजपमध्ये जाण्यास तयार आहेत. सद्या या मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा असून, या गटाचे प्रतापराव जाधव हे विद्यमान खासदार आहेत. परंतु, आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा निवडून येण्याची शक्यता तशी कमी आहे. तर शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून प्रा. नरेंद्र खेडेकर, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याकडून सौ. रेखाताई पुरूषोत्तम खेडेकर या निवडणुकीला उभे राहणार आहेत. शिवाय, या मतदारसंघावर काँग्रेसही दावा सांगणार असून, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस हर्षवर्धन सपकाळ हे इच्छुक आहेत. अशा परिस्थितीत भाजपने रविकांत तुपकर यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली तर भाजपची ही जागा हमखास विजयी होणार असल्याचे जिल्ह्यातील राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!