पारनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मांडवे बु येथील मुळा नदीवरील पुलाचे कठडे तुटल्याने पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. तसेच संरक्षक कठड्यासाठी असणारे लोखंडी पाईप दिसेनासे झाल्याचे चित्र दिसत आहे. वाहतुकीसाठी सुरक्षित असणारे कठडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पूर्ववत करावेत, अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर व वाहन चालकांसह ग्रामस्थांनी केली आहे.
संगमनेर तालुक्यातील मांडवे बु आणि पारनेर तालुक्यातील मांडवे खु या दोन गावांना मुळा नदीवरील पुल जोडलेला आहे. या पुलावरून वाहतूकीसह नागरिक मोठ्या प्रमाणात ये – जा करत असतात. तसेच शाळकरी विद्यार्थीही संगमनेर – पारनेर तालुक्यात शिक्षणासाठी ये – जा करतात. त्यात पावसाळ्यात मुळा नदीच्या पाण्याचा प्रवाह बघण्यासाठी पुलावर गर्दी करत असतात. अशावेळी अनर्थ घडण्याची शक्यता आहे. कारण पुलाचे एका साईटचे लोखंडी कठडे अनेक दिवसांपासून तुटलेले असल्याने पुलावरून प्रवास करणार्या प्रवाशांना पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. लोखंडी पाईप व अँगलच्या सहाय्याने पुलाला संरक्षण देण्यात आले होते. परंतु, एका बाजूने असणारे सुरक्षागार्ड तुटलेली आहेत. काही ठिकाणी पाईप निघून गेली असून, काही ठिकाणी उभे केलेले अँगल वाकलेले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाला सुरक्षेच्या दृष्टीने तुटलेले लोखंडी कठडे बसवून त्वरीत दुरुस्त करावा, अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेने व प्रवासी आणि स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
संरक्षक कठडे तुटल्यामुळे बऱ्याच दिवसापासून ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. रात्री अपरात्री या भागातून वाहतूक सुरू असते. पारनेर व संगमनेर या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या या रस्त्यावरील हा पूल धोकादायक बनल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तात्काळ प्रशासनाने दुर्लक्ष न करता संरक्षण कठडे बसवावेत अन्यथा भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
– संतोष वाडेकर, (अध्यक्ष – भूमिपुत्र शेतकरी संघटना)