Breaking newsHead linesMumbaiPolitical NewsPolitics

‘धनुष्यबाण’ शिवसेनेपासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही : उद्धव ठाकरे

“उद्याची जी केस आहे ती देशात लोकशाहीचं भविष्य किती काळ टिकणार आहे? बाबासाहेबांच्या राज्यघटनेनुसार देश चालणार आहे का? हे दाखवणारा तो निकाल असेल!”

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – भाजपने घात केला होता, म्हणून महाविकास आघाडीचा जन्म झाला होता. पुन्हा विधानसभेच्या निवडणुका घ्या, जर आम्ही चुकलो असेल तर जनता आम्हाला घरी बसवेल, असे सांगून शिवसेनेचा धनुष्यबाण कुणीही शिवसेनेपासून हिरावून घेऊ शकत नाही, असे रोखठोक प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या.
ठाकरे म्हणाले, की माझ्यासोबतचे १५-१६ आमदार माझ्यासोबत राहिले, त्यांचे मी कौतुक करतो. त्यांना धमक्या दिल्या गेल्या पण ते म्हणाले की आम्ही नाही हटणार. शिवसेनेच्या भवितव्याला कुणीही धोका पोहोचू शकत नाही. समाजात भ्रम निर्माण केला जात आहे. सर्व आमदार गेले तरी शिवसेना संपू शकत नाही. मोठी झालेली माणसे शिवसेनेतून गेली आहेत, पण ज्यांनी त्यांना मोठे केले ती माणसे शिवसेनेत आहेत, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी उद्याच्या सर्वोच्च न्यायालयातील संभाव्य निकालाबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, की उद्याच्या निकालातून लोकशाहीचे भवितव्य लक्षात येईल. लोकशाहीचे चार स्तंभ आपले कर्तव्य नीट पार पाडतात का? ते जग पाहणार आहे. उद्याची जी केस आहे, ती देशात लोकशाही किती काळ टिकणार आहे? बाबासाहेबांच्या संविधानानुसार देश चालणार आहे का? हे दाखविणारा तो निकाल असेल. मला जो त्रास झाला, तो कुणाला झाला नसेल, असे सांगून ठाकरे यांनी काल रात्रीपर्यंत दररोज शिवसैनिकांचे लोंढे येत आहेत, सर्वांच्या डोळ्यात अश्रू आहेत, भावना दाटून आल्या आहेत. मातोश्रीने सन्मानाने परत बोलावले तर, भाजपशी चर्चा केली तर, आम्ही परत येऊ, असे काहीजण आता बोलत आहेत, परंतु तिकडे जाऊन तुम्ही हे प्रेम दाखवत आहात का? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.
या पत्रकार परिषदेतून त्यांनी कुणावर टीका केली नसली तरी आपले मन मात्र मोकळे केले. तसेच, उद्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून फार अपेक्षा असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!