दिव्यांगांना लागणार्या मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी जिल्ह्यात विशेष अभियान
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – दिव्यांग कल्याण विभागाच्यावतीने राज्यभर दिव्यांगांना लागणार्या मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सोलापूर जिल्ह्यामध्ये बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे होते. या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर तसेच विठ्ठल उदमले उपजिल्हाधिकारी महसूल उपस्थित होते.
याप्रसंगी दिव्यांगाना शीघ्र निदान शिबिर आयोजित करून तात्काळ वैश्विक ओळखपत्र व दिव्यांग प्रमाणपत्र दिव्यांगांना शिक्षण प्रशिक्षण आरोग्य विमा याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी आरोग्य यंत्रणेस तात्काळ दिव्यांगांना युडी आयडी कार्ड (वैश्विक) ओळखपत्र देण्याबाबत तात्काळ पावले उचलावी. त्या दृष्टीने योग्य ते नियोजन करावे शा सूचना दिल्या. त्यासोबतच महसूल विभागाकडून उत्पन्नाचे दाखले शेतीविषयक इतर दाखले जातीचे दाखले देण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आढावा घेत असताना जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत तसेच नगरपालिका नगरपरिषद, नगरपंचायत यांनी पाच टक्के दिव्यांगाचा निधी खर्च होईल याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कोणताही दिव्यांग आरोग्य व शिक्षणापासून वंचित राहणार नाही याबाबत संबंधित विभागाने दक्षता घेण्याचे सुचित केले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी दिव्यांगासाठी असणार्या रोजगार संबंधी विविध योजना राबविण्यात येणार आहेत. त्याचे सादरीकरण केले. तसेच सदर अभियानाची रूपरेषा सागितले. याप्रसंगी वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय सह अधिष्ठाता डॉ. रामेश्वर डावकर, डॉ. यशोदा जाधव, दिव्यांग महामंडळाचे समन्वयक प्रीती भास्कर, अग्रणी बँकेचे धनाळे आदी उपस्थित होते. जिल्हा समाज कल्याण अधिकारी खमितकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. ही बैठक यशस्वी होण्यासाठी दिव्यांग शाखेचे सच्चिदानंद बांगर वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता तसेच कमलाकर तिकटे व राजेश माळवदकर यांनी परिश्रम घेतले.