बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी विजयराज शिंदे यांच्यावर!
– शिंदेंना शिवसेनेत (ठाकरे) परत जाण्यापासून रोखण्याची भाजपची खेळी?
बुलढाणा/मुंबई (प्राची कुलकर्णी/बाळू वानखेडे) – ज्या जागा सद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे आहे, त्या जागा आम्ही परत लढवू व लोकसभा निवडणुकीत यश मिळवू, असे शिंदे गटाचे नेते सांगत असले तरी, भारतीय जनता पक्षाने आज लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख जाहीर केले असून, शिंदे गटाच्या मतदारसंघातही हे प्रमुख नियुक्त करण्यात आल्याने राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी माजी आमदार, तथा शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांचे कट्टर राजकीय विरोधक विजयराज शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुलढाण्यात शिंदे गटाचा विद्यमान खासदार असून, खा. प्रतापराव जाधव हे संपर्कप्रमुखदेखील आहेत. दरम्यान, विजयराज शिंदे हे शिवसेना (ठाकरे) पक्षात परत जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात असताना, व तशा हालचालीदेखील सुरू असताना, त्यांच्यावर नवी जबाबदारी देऊन भाजपने त्यांना रोखण्याची खेळी खेळली असल्याचीही राजकीय चर्चा आहे. आता विजयराज शिंदे हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार विजयी करण्यासाठी ताकद लावणार असल्याने विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचे काय? अशा प्रश्न निर्माण झालेला आहे.
भारतीय जनता पक्षाने राज्यातील ४२ लोकसभा मतदारसंघात आपली तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा व विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली. या यादीत माजी आमदार तथा भाजपचे नेते विजयराज शिंदे यांची बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने शिंदे गटाच्या भुवया उंचावलेल्या आहेत. तर विधानसभा मतदारसंघप्रमुख म्हणून मलकापूर शैलेश मिरगे, बुलढाणा योगेंद्र गोडे, चिखली सुनील वायाळ, सिंदखेडराजा गजानन घुले, मेहकर (एससी राखीव) प्रकाश गवई, खामगाव संजय शिंगारे, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघासाठी गजानन सिसोदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने लोकसभा व विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख नेमून या सर्व मतदारसंघात स्वबळावर लढण्याची तर तयारी केली नाही ना? असा प्रश्नही आता निर्माण झालेला आहे.
लोकसभेच्या निवडणुका अवघ्या ८ महिन्यावर आल्या आहेत, त्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकादेखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व निवडणूक प्रमुखांवर मोठी जबाबदारी पक्षाने सोपावली असून, हे सर्व निवडणूक प्रमुख भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. शिवसेनेतून व्हाया बहुजन वंचित आघाडी असा राजकीय प्रवास केलेले माजी आमदार विजयराज शिंदे हे भाजपमध्ये आल्यापासून पक्षात तसे दुर्लक्षितच झाले होते. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात उद्धव ठाकरे गटाविरोधात दंड थोपाटले आहेत. सद्या शिंदे गटाच्यावतीने ते ठाकरेंच्या शिवसेनेवर चांगलेच शाब्दिक हल्ले चढवित असतात. तथापि, बुलढाण्यात विजयराज शिंदे व संजय गायकवाड यांच्यातून विस्तव जात नाही. तर शिंदे गट व भाजपने आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचे जाहीर केले आहे, तथापि, बुलढाण्याची जागा शिंदे गटाकडे की, भाजपकडे राहील? याबाबत अद्याप काहीच जाहीर केलेले नाही. या मतदारसंघात शिंदे गटाचा खासदार असून, खा. प्रतापराव जाधव हे शिंदे गटाचे संपर्कप्रमुखदेखील आहेत. त्यामुळे विजयराज शिंदे यांनी लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख म्हणून झालेली नियुक्ती, तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या पाहाता, शिंदे गटाची डोकेदुखी वाढली आहे.
भारतीय जनता पक्षाने ४२ लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून, त्यात बुलढाण्याचा समावेश आहे. याचा अर्थ भविष्यात शिंदे गटाला फक्त सहा जागा सोडल्या जाऊ शकतात, आणि त्यात बुलढाण्याचा समावेश नसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राजकारणात विविध चर्चा आतापासून रंगायला सुरूवात झाली आहे. त्यातच विजयराज शिंदे यांच्या नियुक्तीने भाजपने एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याचीही चर्चा सुरू असून, देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना निवडणुकांच्या तोंडावर राजकीय ताकद दिली असल्याची चर्चा होत आहे.
——————