Aalandi

इंद्रायणी नदीप्रदूषण रोखण्यासाठीचे साखळी उपोषण पाचव्याच दिवशी मागे!

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील देहू आळंदीतून वाहणारी पवित्र इंद्रायणी नदी प्रचंड प्रदूषित झाल्याने नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून साखळी उपोषण सुरु करण्यात आले होते. उपोषणाचे पाचव्या दिवशी ( दि. ५ ) खेडचे प्रांत डॉ. विक्रांत चव्हाण यांनी येथया दहा दिवसांत या संदर्भात पुणे जिल्हा स्तरावर बैठकीचे आयोजन केले जाईल अशी ग्वाही दिल्याने साखळी उपोषण मागे घेण्यात आले.

इंद्रायणी नदीचे पात्रातील पाण्याचे प्रदूषण रोखण्यासह प्रदूषण करणार्‍या घटकांवर कारवाई करण्याचे मागणी साठी १ मे कामगार दिनापासून साखळी उपोषण माऊली मंदिरा समोर सुरु करण्यात आले होते. पाचव्या दिवशी उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी वरिष्ठांशी चारचा करून पुढील दहा दिवसांत पुणे जिल्हाधिकारी यांचे स्तरावर बैठक लावण्याची ग्वाही देण्यात आल्याने आळंदी मंडलाधिकारी स्मिता जोशी यांचे हस्ते जलपेय घेत उपोषण मागे घेण्यात आले. बैठकीला संबंधित विभाग आणि यंत्रणांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती राहणार आहे. इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या पदाधिकार्‍यांना उपविभागीय दंडाधिकारी खेड यांच्या वतीने यासाठी लेखी पत्र देण्यात आले आहे.

यावेळी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, इंद्रायणी सेवा फौंडेशन अध्यक्ष विठ्ठल शिंदे, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, विलास काटे, दादासाहेब कारंडे, ज्ञानेश्वर कुर्‍हाडे, दिनेश कुर्‍हाडे, डॉ.सुनिल वाघमारे, प्रकाश पानसरे, शिरीष कारेकर, जनार्दन पितळे, प्रफुल्ल प्रसादे माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, माजी नगरसेवक दिनेश घुले आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित होते.
साखळी उपोषण विठ्ठल शिंदे, शिरीष कारेकर, हभप पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, डॉ. सुनिल वाघमारे, अरुण बडगुजर यांनी केले. या साखळी उपोषणास आळंदी जनहित फाउंडेशन, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानसह विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती, पदाधिकारी, संस्थान, वारकरी संप्रदायातील विविध घटक यांनी पाठिंबा देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!