आळंदी नगरपरिषद शहर पथविक्रेता समिती निवडणूक शांततेत
संतोष सोनवणे बहुमताने विजयी ; पाच जागा बिनविरोध
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी नगरपरिषद शहर पथविक्रेता समिती निवडणूक २०२४ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी निवडणूक शांततेत पार पडली. या निवडणुकीत महाराष्ट्र राज्य पथारी सुरक्षा दलाचे पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष लक्ष्मण सोनवणे यांना २२३ मते मिळवून ते बहुमताने विजइ झाले. तसेच पाच सदस्य बिनविरोध निवडले गेले. मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचे हस्ते विजयी उमेदवार सदस्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यता मध्ये गणेश काळे, काजल धोंडगे, सुनिता ठुबे, मंचक यादव, ज्ञानेश्वर भोसले यांचा समावेश आहे. विजयी उमेदवारांनी आनंदउत्सवात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळा स्मारक येथे जाऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. प्रदक्षिणा मार्गावरून शांततेत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संघर्ष नायक लोकनेते भगवानराव वैराट, तसेच कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे उपस्थित होते. ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी कामगार सुरक्षा दल संलग्न पथारी सुरक्षा दल सह टपरी,हातगाडी, पथारी पंचायत सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी या सर्वांनी सहकार्य केले. सर्व आळंदी शहरातील पथ विक्रेत्यांचे संतोष सोनवणे यांना भरघोस मतांनी निवडून दिल्या बद्दल संघटने तर्फे त्यांनी आभार मानले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हंणून मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी काम पाहिले.