इंद्रायणीत उडी घेतलेल्या महिला पोलिस कर्मचारी दोन दिवसांपासून बेपत्ता!
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील गरूडस्तंभ येथून इंद्रायणी नदीच्या पाण्यात उडी घेतलेली वीस वर्षीय महिला पोलीस कर्मचारी यांचा दि. २५ ऑगस्टपासून आळंदी परिसरातील इंद्रायणी नदी पात्रात शोध सुरु असून, सोमवारी (दि.२६) सायंकाळपर्यंत बेपत्ता महिला पोलीस कर्मचारी मुलीचा शोध लागला नाही. मंगळवारी (दि.२७) सकाळी शोधमोहीम पुन्हा सुरू झाली होती. हे वृत्तलिहिपर्यंत तरी हा मृतदेह सापडला नव्हता. आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या. त्या सध्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे नेमणुकीस होत्या. त्यांनी रविवारी सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी मारली. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
रविवारी (दि.२५) अनुष्का सुहास केदार (वय २० वर्षे, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी) या महिला पोलिसाने इंद्रायणी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली होती. या महिला पोलीस कर्मचारी यांचे शोधासाठी आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरु केली. कालपासून तिचा मृतदेह सापडला नाही. अनुष्का केदार यांचे नदी पात्रात शोधासाठी मंगळवारीदेखील शोधण्याचे काम सुरू ठेवण्यात येणार आहे. या शोधमोहिमेत एनडीआरएफकडील ३० जवान, ४ बोटीद्वारे इंद्रायणी घाट आळंदी परिसरात शोध घेण्यात आला. यासाठी आळंदी नगरपरिषद कडील १ बोट, ६ कर्मचारी यांचीही मदत घेण्यात आली. यात यांनी च-होली खुर्द, च-होली बुद्रुक, च-होली बायपास या ठिकाणी शोध घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या कडील ११ जवान, १ बोट द्वारे सोळू, वडगाव, गोलेगाव तसेच इतर इंद्रायणीच्या पात्रातदेखील शोध मोहीम राबविण्यात आली. आळंदी पोलीस स्टेशन मधील ३ अधिकारी आणि २५ पोलिस अंमलदार यांनी इंद्रायणी नदीच्या दोन्ही बाजूने शोध घेण्यास परिश्रम घेत शोध कार्य केले. मात्र सोमवारी सायंकाळपर्यंत बेपत्ता मुलीचा शोध लागला नाही. आज, मंगळवारी पुन्हा सकाळी शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. इंद्रायणी नदीचे लाभक्षेत्रात आणि पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने नदीला पूर आला असून, शोधकार्यात यामुळे बाधा येत आहे.