BULDHANAHead linesVidharbha

सभापती, उपसभापती निवडीसाठी राजकीय नेते सावध!

– ‘दगाफटका’ होऊ नये यासाठी सर्वच पक्ष ‘अ‍ॅलर्ट मोड’वर!
– महाविकास आघाडी सात, शिंदे गट दोन तर भाजपचा एका बाजार समितीत सभापती व उपसभापती शक्य!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांच्या निवड़णुकीसाठीची रणधुमाळी संपल्यानंतर आता बाजार समित्यांच्या सभापती, उपसभापती निवड़ीकड़े सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पक्षीय बलाबल पाहता, महाविकास आघाडी सात, शिवसेना शिंदे गट दोन तर भाजपचा एका बाजार समितीत सभापती व उपसभापती बसणार आहे. तर काही दगाफटका होऊ नये, यासाठी सर्वंच पक्ष अ‍ॅलर्ट मोड़वर दिसत असून, निवड़ीची तारीख केव्हाही जाहीर होऊ शकते, त्यादृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.

जिल्ह्यातील मेहकर, लोणार, देऊळगावराजा, चिखली, बुलढाणा, खामगाव, नांदुरा, शेगाव, जळगाव जामोद व मलकापूर बाजार समित्यांसाठी २८ व ३० एप्रिलरोजी निवड़णूक पार पड़ली. निवड़णूक झाल्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस दिवसात सभापती, उपसभापती निवड़ होणे अपेक्षित असते. त्यामुळे निवड़ीची तारीख केव्हाही घोषित होणार असल्याने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मेहकर बाजार समितीत मोठी दमछाक झाल्यानंतर शिंदेगटाला अर्थात खासदार प्रतापराव जाधव व आ. ड़ॉ. संजय रायमुलकर यांना संख्याबळ कमी झाले असले तरी सत्ता कायम राखण्यात यश आले. येथे शिंदे गटाला ११ तर शिवसेनेचे (ठाकरे) स्थानिक नेते आशीष दिलीपराव राहाटे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला सात जागा मिळाल्या आहेत. येथे अपेक्षेप्रमाणे खा. प्रतापराव जाधव यांचे भाऊ माधवराव जाधव हे सभापती होवू शकतात तर उपसभापती म्हणून अरविंद दळवी, बबनराव भोसले यांच्यासह इतरांनाही संधी मिळू शकते. निवड़णूक दरम्यान आलेली ‘रिअ‍ॅक्शन’ पाहता, इतरांनाही पदाची संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी तशी शक्यता सध्यातरी कमीच दिसते. लोणार बाजार समितीत खा. जाधव व आ. रायमूलकर अर्थात शिंदे गटाला बारा तर महाआघाडीला सहा जागा मिळाल्या आहेत. येथे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी, यांना सभापती तर जगाराव आड़े, मोतीराम ड़व्हळे, भगवान कोकाटे यांना उपसभापतीपदाची संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. देऊळगावराजा बाजार समितीमध्ये महाआघाडीच्या १५ तर शिवसेना शिंदे गट युतीच्या अवघ्या तीन जागा आल्या आहेत. या ठिकाणी माजी मंत्री आ. ड़ॉ.राजेन्द्र शिंगणे ठरवतील त्यांच्याच गळ्यात सभापती व उपसभापती पदाची माळ पड़णार आहे. येथे संतोष खांड़ेभराड़सह इतरांच्या नावाची चर्चा आहे.
बहुचर्चित ठरलेल्या चिखली बाजार समितीत महाविकास आघाडीला तब्बल १७ तर भाजप-शिंदे गटाला अवघी एक जागा मिळाली. ती जागाही शिंदे गटाची असल्याचे सांगण्यात येत असून, आ. श्वेताताई महाले यांना भोपळाही फोड़ता आला नाही, तर दिग्गज राजकारणी म्हणून जिल्ह्यात सुपरिचित असलेले माजी आ. धृपतराव सावळें आपल्या भावाचा पराभवदेखील रोखू शकले नाहीत. येथे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंन्द्रे ठरवतील तो सभापती होणार आहे. यासाठी समाधान सुपेकर, सौ.कमल विष्णू कुळसंदर, राम खेड़ेकर यांना संधी मिळू शकते. शिवसेना (ठाकरे) श्रीकिसन धोंड़गे यांना उपसभापतीपद मिळते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, सभापती व उपसभापती निवडणुकीत काही राजकीय चमत्कार घडू शकतो, अशी शक्यताही वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने राहुल बोंद्रे हे निवडून आलेल्या सर्व संचालकांवर लक्ष ठेवून आहेत.
बुलढाणा बाजार समितीत महाआघाडीला १२ तर शिंदे गट युतीला सहा जागा मिळाल्या आहेत. येथे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमख जालिंदर बुधवत यांना सभापतीपद मिळू शकते. माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांनी एकहाती किल्ला लढवलेल्या खामगाव बाजार समितीत महाआघाडी व वंचित बहुजन आघाडीला १५ तर भाजपचे आ. आकाश फुंड़कर यांना केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. वार्षिक अंदाजे तीन हजार कोटींच्यावर उलाढाल असलेल्या या बाजार समितीत कोण सभापती होणार याकड़े सर्वांच्या नजरा आहेत. येथे शांताराम पाटेखेड़े, ताठे, पेसोड़े, टिकार यांची सभापतीपदासाठी नावे चर्चेत आहेत, तर उपसभापतीपद हे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संघपाल जाधव यांना मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. येथे राष्ट्रवादीलाही आशा आहे. शेगाव बाजार समितीत दादा व नाना गटाला सर्व अठरा जागा मिळाल्या असून, येथे आ.ड़ॉ. संजय कुटे तोंड़घशी पड़ले आहेत. श्रीधर पांड़ुरंग पाटीलसह इतरांच्या नावाची येथे चर्चा आहे. जळगाव जामोद बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश नेते प्रसेनजीत पाटील यांना ११ जागा मिळाल्या आहेत. भाजपसह अभद्र युतीला मतदारांनी सत्तेपासून दूर ठेवले आहे. येथे प्रसेनजीत पाटील किंवा ते म्हणतील ते नाव सभापती, उपसभापती पदासाठी फायनल होणार आहे, यात शंका नाही.
नांदुरा बाजार समितीत महाआघाडीला तेरा तर भाजप-शिंदे गटाला पाच जागा मिळाल्या आहेत. येथे आ.राजेश एकड़े यांचा निर्णय अंतिम राहणार असून, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांची भूमिका ही महत्त्वाची राहणार आहे. मलकापूर बाजार समितीत माजी अा. चैनसुख संचेती यांच्या १६ जागा आल्या आहेत. येथे आ. एकड़े यांच्या पॅनलची पार धूळदाण उडाली होती. याठिकाणी सभापतीपदासाठी शिवचंद्र तायड़े यांना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात येथे चैनूभाऊंचा निर्णय अंतिम राहणार आहे.
ज्यांच्या जागा जास्त त्या पक्षाचा सभापती हा महाविकास आघाडीचा जुनाच फॉर्म्युला आहे. पण सत्तेच्या तड़जोड़ीत काही बदल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. परंतु, राज्यातील सत्तासंघर्ष व निवड़णुकी दरम्यानचा टोकाचा विरोध पाहता, तसे होईल किंवा काही दगाफटका होईल, याची सुताराम शक्यता दिसत नाही. पण राजकारणात काहीही अशक्य नाही. तर काही ठिकाणी पद वाटपाबाबत धक्कातंत्रांचा वापर झाल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. तशाही या निवडणुका पक्षीय चिन्हावर लढविल्या जात नाहीत. त्यादृष्टीने सर्वच पक्ष अ‍ॅलर्ट मोड़वर असून, सभापती, उपसभापती निवड़ीच्या तारखेकड़े मात्र राजकारण्यांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!