ChikhaliHead linesVidharbha

पूर्णा नदीपात्रातून वाळूतस्करी; शासकीय कामांसाठी सर्रास चोरटी वाळू!

मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यातून जाणार्‍या पूर्णा नदीच्या पात्रातून सर्रास वाळूतस्करी सुरू असून, या गंभीर प्रकाराकडे महसूल विभागाचे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष चालू आहे. विशेष बाब म्हणजे, जिल्ह्यात एकाही रेतीघाटाचा लिलाव झालेला नसताना, शासकीय कामांसाठी वाळू कशी काय उपलब्ध होत आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. म्हणजेच, शासकीय बांधकामांसाठीदेखील चोरट्यामार्गाने वाळू उपलब्ध केली जात असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात गत दोन वर्षांपासून रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया रखडलेली आहे. सध्या बुलढाणा जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये घरकुल योजना चालू असताना, त्या कामावर मात्र रेती उपलब्ध होत असून, ही रेती चोरट्यामार्गाने आणली जात आहे. घरकुल योजनेसह तालुक्यात अनेक शासकीय कामावर जसे रोडवरील पुल बांधकाम, गावागावातील जलकुंभ, गावातील सिमेंट रस्ते, नदी नाल्यावरील सिमेंट बंधारे अशा अनेक व इतर शासकीय कामावर चोरट्यामार्गाने आलेल्या रेतीचा वापर होत असताना महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे. याबाबत महसूल विभागाची जिल्ह्यामध्ये कोणतीही कारवाई झाल्याचे अजून आढळून आलेले नाही.

एकीकडे अवैध रेतीचे टिप्पर पकडून त्यांच्याकडून लाखोचा दंड वसूल करायचा व दुसरीकडे शासकीय कामावर चोरटी वाळू वापरायची, अशी दुटप्पी भूमिका महसूल विभागाची दिसून येत आहे. वाळू घाटाचा कोणताही लिलाव झालेला नसतानाही महसूल विभागाच्या आशीर्वादानेच सिंदखेडराजा, देऊळगावराजा या तालुक्यातून जाणार्‍या पूर्णा नदीतून वाळूतस्करांनी रात्रंदिवस सर्रास वाळू उपसा चालू असल्याचे निर्देशनात आले आहे. सिंदखेडराजा तालुका, देऊळगावराजा तालुका, चिखली तालुका या तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूर्णा नदीपात्रातून वाळू उपसा करून वाळू पुरवठा केला जात आहे. तसेच तिन्ही तालुक्यासह जिल्ह्यात शासकीय कामावरसुद्धा पूर्णा नदीच्या वाळूचा वापर होताना दिसत आहे. याप्रश्नी जिल्हाधिकारी यांनीच गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज निर्माण झालेली आहे.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!