Breaking newsHead linesMaharashtraMumbaiPolitical NewsPoliticsWorld update

शरद पवारच राष्ट्रवादीचे ‘बॉस’; राजीनामा अखेर मागे!

– शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला अजितदादांची अनुपस्थिती खटकली!

मुंबई (प्राची कुलकर्णी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा २ मेरोजी दिलेला राजीनामा अखेर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज तब्बल चार दिवसांनंतर मागे घेतला आहे. पत्रकार परिषद घेत, या निर्णयाची पवारांनी माहिती दिली. ते म्हणाले, की ‘कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर राखत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.’ पवारांच्या राजीनाम्यानंतर पक्षात अस्वस्थता निर्माण झाली होती. अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तीव्र आंदोलन करत होते, तर अनेकांनी आपले राजीनामे दिले होते. त्यामुळे अखेर कार्यकर्त्यांच्या दबावापुढे शरद पवार झुकले असल्याचे दिसून येत आहे. या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे मात्र अनुपस्थित दिसल्याने त्यांची अनुपस्थिती अनेकांना खटकली होती.

आज सकाळी पक्ष कार्यालयात पक्षाच्या कोर कमिटीची बैठक झाली होती. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांचा राजीनामा फेटाळण्याचा प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव एकमताने पारित करण्यात आला व तशी सूचना शरद पवार यांना देण्यात आली. कोर कमिटीच्या बैठकीचा जो निर्णय असेल, तो आपण मान्य करू, असे पवारांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यामुळे हा निर्णय मान्य करत, शरद पवार यांनी आपला राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला आहे. सायंकाळी साडेपाच वाजता शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे दिसले नाहीत, त्यांची अनुपस्थिती पत्रकारांना खटकली. याबाबत शरद पवार यांना विचारले गेले असता, सर्व नेते एकत्र आहेत, असे उत्तर त्यांनी दिले. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्तराधिकारी कोण असेल, याबाबत योजना बनविण्याचे सूतोवाचही याप्रसंगी पवारांनी केले.

‘देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षाचे नेते आणि सहकारी, मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी विनंती केली. लोक माझे सांगाती, हेच माझ्या परीने प्रदीर्घ सार्वजनिक जीवनाचे गमक आहे, माझ्याकडून आपल्या भावनाचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारवून गेलो आहे.’

– शरद पवार

 

पक्षात संघटनात्मक बदलेले केले जाणार असून, आपण अधिक जोमाने पक्षकार्य करू, असेही पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीच्या निर्णयानंतर तीव्र पडसाद उमटले. कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. माझ्याकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. मी पुनश्च: अध्यक्षपद स्वीकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते, असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदार्‍या सोपवणे, नवीन नेतृत्त्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करील, असे शरद पवार याप्रसंगी म्हणाले.


भाकरी फिरवणार होतो, पण ती भाकरीच आता थांबली, असे म्हणत शरद पवार यांनी सुचक वक्तव्य केले. अजित पवार हे या पत्रकार परिषदेला अनुपस्थित असल्याने शरद पवार यांचे हे वक्तव्य चर्चेत आले. नवे पद निर्माण करण्याची गरज नाही. ज्यांना जायचे असेल त्यांना थांबवू शकत नाही, असेही शरद पवार यावेळी म्हणाले. अजित पवार दिल्लीला गेले हे चुकीचे आहे. सुप्रिया सुळे अध्यक्ष होईल, यात तथ्य नाही, असेही शरद पवार यांनी सांगून, अजित पवारांना माझ्या राजीनाम्याची पूर्वकल्पना होती, असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.


दरम्यान, उशीरा अजित पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. अजितदादा म्हणाले, की ‘शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे हा राज्यातील, देशातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन पदावर कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ देणारा आहे,’ अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!