सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी समताधिष्टीत समाजाची निर्मिती करून समाज सुधारण्याचे महान कार्य केले. आंतरजातीय विवाह असो अथवा जातीभेद, अंधश्रद्धा निर्मूलन तसेच स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार असो, त्यांनी त्यावेळी प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन केले. दोन हजार वचने लिहिली, साहित्याची निर्मिती केली, असे महान संत महात्मा बसवेश्वरांचे साहित्य, विचार, वचने नव्या पिढीसमोर आणून या अध्यासन केंद्राचे नाव देशभर करा, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांनी केले.
शनिवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचे उद्घाटन डॉ. स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, बसव साहित्य प्रचारक डॉ. आप्पासाहेब पुजारी, डॉ. बी. बी. पुजारी, कुलसचिव योगिनी घारे, वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणिक शाह, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी अध्यासन केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले.
डॉ. स्वामी यांनी महात्मा बसवेश्वरांच्या जीवनकार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी बसवेश्वरांच्या साहित्याचा अभ्यास केला पाहिजे, असे सांगत या अध्यासन केंद्रात बसवेश्वरांच्या वचनांवर संशोधन व्हावे तसेच साहित्य देखील इतर भाषेमध्ये अनुवादित झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. अप्पासाहेब पुजारी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वरांचे अध्यासन केंद्र होणे म्हणजे आजचा दिवस सोनेरी अक्षरात कोरणारा दिवस असल्याचे स्पष्ट केले. महात्मा बसवेश्वरांना समजून घेणे खूप मोठे काम आहे, या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून त्यांचे साहित्य विविध भाषेत समाजासमोर यावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. डॉ. बी. बी. पुजारी यांनी महात्मा बसवेश्वरांच्या वचनांचा अभ्यास केला तर मानवी जीवनावर खूप सकारात्मक बदल होईल, असे सांगत आपल्या कामाप्रती सर्वांनी आदर बाळगावा. महात्मा बसवेश्वरांनी आपल्या वचनांतून हेच सांगितल्याचे ते म्हणाले.
कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र सुरू करण्यासाठी शासनाने मंजुरी देऊन तीन कोटी रुपये अनुदान दिल्याचे सांगितले. अनुदानाच्या व्याजातून सदरील केंद्र चालणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली यांनी केले तर आभार डॉ. दत्ता घोलप यांनी मानले.
अध्यासन केंद्रास पहिल्या दिवशी ७५ हजार रुपयांची देणगी!
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात शनिवारी महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचा उद्घाटन सोहळा झाला. या समारंभात मंगळवेढ्याचे बसव साहित्य प्रचारक डॉ. आप्पासाहेब पुजारी यांनी ५० हजार रुपयांचा धनादेश कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. त्याचबरोबर अरविंद लोणी यांनी देखील २५ हजार रुपयांची देणगी दिली.