AalandiPachhim Maharashtra

माऊलींच्या पालखी रथास भोसले ग्रामस्थांची बैलजोडी!

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : माऊलींचे पालखी रथास बैलजोडीची सन २०२३ पालखी सोहळ्यास यावर्षीची सेवा देण्याचा मान येथील जेष्ठ नागरिक तुळशीराम भोसले आणि त्यांचे पुतणे रोहित भोसले यांचे बैलजोडीस देण्याचा निर्णय घेण्यात येऊन तसे आळंदी देवस्थानला कळविण्यात आले आहे. अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.

ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२३ साठी श्रींचे वैभवी पालखी रथास बैलजोडी सेवा देण्यासाठी निवड समितीची बैठक झाली. या वेळी बैठकीत समितीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, समिती सदस्य पै. शिवाजीराव रानवडे, नंदकुमार कुऱ्हाडे, विलास घुंडरे, रामदास भोसले, रमेश कुऱ्हाडे, ज्ञानोबा वहिले या समिती पदाधिका-यांचे उपस्थितीत बैठक झाली. श्रींचे पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातून जून मध्ये प्रस्थान होणार आहे. यासाठी श्रींचे पालखी रथास बैलजोडी सेवा पुरविण्याचा मान येथील ग्रामस्थ तुळशीराम भोसले आणि त्यांचे पुतणे रोहित भोसले यांचे परिवारातील कुटुंबीयांस रोटेशनने देण्याचा निर्णय घेत जाहीर करण्यात आला. सेवेसाठी यावर्षी भोसले घराण्यास रोटेशन ने संधी मिळत आहे. यासाठी आळंदी देवस्थानाकडे माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, नगारखान्याचे मानकरी बाळासाहेब दगडू भोसले, निलेश भोसले, रोहित भोसले, तुळशीराम भोसले, उत्तम भोसले, पांडुरंग भोसले असे सात अर्ज भोसले कुटुंबियांकडून देण्यात आले होते. या आलेल्या अर्जावर संबंधितां समवेत चर्चा करीत सुसंवाद साधून बैलजोडी सेवा देण्याचे मानकरी यांचे नावावर शिक्का मोर्तब करण्यात आला. आळंदीतील जेष्ठ नागरिक तुळशीराम भोसले आणि त्यांचे पुतणे रोहित चंद्रकांत भोसले यांना यावर्षीची सेवा परंपरेने देण्यात आली. समितीचे पदाधिकारी यांनी घेतलेला निर्णय मानकरी यांचे नावाची शिफारस करून ठराव मंजूर करण्यात आला आहे. या बैठकीत निवड समितीने सर्वानुमते भोसले कुटुंबियांकडून प्राप्त अर्जावर निर्णय घेत आळंदी देवस्थानला कळविले असल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले.

श्रींचे पालखी रथास बैलजोडी सेवा देणारे मानकरी तुळशीराम भोसले आणि कुटुंबीयांचा आळंदी देवस्थान व समितीचे वतीने सत्कार करण्यात आला. संस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांचे हस्ते देवस्थान तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले, रामदास भोसले, पांडुरंग भोसले, रोहित भोसले, गोपीनाथ भोसले, संतोष भोसले उपस्थित होते. उपस्थितांनी या निर्णयाचे स्वागत करीत श्रींचे वैभवी चांदीचे रथाला बैलजोडी जुंपण्याची सेवा देण्याची संधी दिल्या बद्दल माजी उपनगराध्यक्ष सागरशेठ भोसले यांनी आभार व्यक्त केले. यावेळी उपस्थित समिती सदस्यांनी भोसले कुटुंबियांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. बैलजोडी निवड समिती मध्ये इतरांना संधी देण्याची मागणी जोर धरत असून अनेक वर्षांपासून समिती पदाधिकारी तेच असल्याने इतराचा देखील विचार करण्याची मागणी होत आहे. समितीची रचना आणि समितीला कायदेशीर अधिकार मिळावेत यासाठी आळंदी देवस्थान कडे नागरिकांचे वतीने मागणी बाबत शहरात चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!