चिखली बाजार समितीवर झेंडा कुणाचा?; आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला!, धृपतराव सावळेंचेही फोन गेले!!
– कुंपनावर बसलेले ठरवणार चिखली बाजार समितीचे भवितव्य!
– ‘मनसे’ मानणारे १२ तरुण ग्रामपंचायत सदस्य कुणाच्या गळाला?
चिखली/बुलढाणा (राजेंद्र शिवाजी घोराडे) – जिल्ह्यामध्ये नुकत्याच झालेल्या दहापैकी पाच बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये पाचपैकी तीन बाजार समित्या जिंकून महाविकास आघाडीने सरशी साधलेली दिसून येत असली तरी, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेली जिल्ह्यातील अतिश्रीमंतांची बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणार्या चिखली बाजार समितीच्या मतदानावर सगळा जिल्हा लक्ष ठेवून आहे. बाजार समितीच्या पाव्हण्या-रावळ्या मतदारांना ज्येष्ठ नेते धृपतराव सावळे यांचे फोन गेले असून, हे सोयरे-धायरे काय चमत्कार घडवितात, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.
चिखलीमध्ये मागील १५ वर्षांपासून सहकार क्षेत्रावर पक्की मांड ठोकून बसलेले माजी आमदार राहुल बोन्द्रे व नुकत्याच झालेल्या लोकमत सर्वेक्षणात ‘महाराष्ट्रातील सर्वात प्रॉमिसिंग तरुण आमदार’ म्हणून निवड झालेल्या व अल्पावधीतच गल्लीपासून- दिल्लीपर्यंत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणार्या आमदार श्वेताताई महाले यांच्यातच खरी लढत असली तरी, माजी आमदार धृपतराव सावळे यांच्या राखीव मतदारांना दुर्लक्षित करता येणार नाही.
राहुलभाऊ बोंद्रे हे सहकाराचे बाळकडू प्यायलेले असले तरी आ. श्वेताताईंचा झंजावात व मागे असलेले ‘सरकारी पाठबळ’ नवीन जादू घडवून आणू शकतात, असा कयास लावला जात आहे. या सर्वांमध्ये धृपतराव सावळे यांनी त्यांच्या राखीव मतदारांना दिलेला आजचा निरोप महत्वाचा ठरणार आहे. शेतकरी संघटना व मनसे हे घटक जिंकणारे असतील की नाही ही शंका आहे, पण ‘पाडणारे’ नक्कीच होऊ शकतात. मनसेच्या १२ विकल्या न जाणार्या युवाशक्तीला काय आदेश येतो, हे नंतर कळेल. फक्त तोपर्यंत बाकीच्यांनी उशीर करू नये, असा सल्ला सहकारातील जाणते देत आहेत. चिखली बाजार समितीसाठी मतदारांना ‘लक्ष्मी’चे दर्शन झाले असून, आज ते काय कौल देतात? यावर राहुलभाऊ बोंद्रे व आ. श्वेताताई महाले पाटील यांच्या राजकीय प्रतिष्ठेचे भवितव्य अवलंबून आहे. अनेक आरोप-प्रत्यारोप व कोर्टकचेर्यांनी ही निवडणूक गाजली आहे. त्यामुळे सिलेक्टेड मतदार काय कौल देतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
———————