– मेहकरात ‘प्रतापगडा’ला हादरे, मात्र सत्ता राखण्यात यश!
– खामगावात सानंदांचा जलवा, मलकापुरात चैनुभाऊंची सरशी, देऊळगावराजात आ. शिंगणेंनी खेडेकरांना धूळ चारली!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – आगामी लोकसभा व विधानसभेच्या लिटमस टेस्ट ठरलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निकालातून महाविकास आघाडीलाच बुलढाणा जिल्हावासीयांचा कौल दिसून आला आहे. जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी आपले गड राखले असून, काल झालेल्या दहापैकी पाच बाजार समित्यांच्या निवडणुकांत महाविकास आघाडीने पाचपैकी तीन बाजार समित्यांत घवघवीत यश संपादन केले असून, शिवसेना (शिंदे गट) व भाजपला प्रत्येकी एकच बाजार समिती जिंकता आली आहे. शिंदे गटाचे संपर्कप्रमुख व खासदार प्रतापराव जाधव यांना त्यांच्यात मेहकर बाजार समिती निवडणुकीत जोरदार हादरे बसले. अत्यंत अतितटीच्या निवडणुकीत त्यांना ही बाजार समिती जिंकण्यात यश आले असले तरी, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आशीष रहाटे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने खा. जाधव व आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्या नाकात चांगलाच दम आणला होता. खा. जाधव यांच्या पॅनेलने ११ जागा जिंकल्या असल्या तरी, महाविकास आघाडीने सात जागा जिंकून आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. तर बुलढाण्यात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना जोरदार दणका देत, महाविकास आघाडीने बाजार समितीवर दणदणीत विजय मिळवला आहे. आ. गायकवाड यांच्या नेतृत्वातील पॅनलला अवघ्या सहा जागा मिळाल्या तर शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वातील पॅनलने १२ जागा जिंकत बाजार समितीवर भगवा फडकविला आहे. खामगावात माजी आ. दिलीप सानंदा यांचा जलवा कायम असून, मलकापुरात गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली बाजार समिती माजी माजी आ. चैनसुख संचेती यांनी एकहाती विजय मिळवत खेचून आणली आहे. या बाजार समितीत त्यांना 18 पैकी 16 जागा मिळाल्या आहेत. तर देऊळगावराजात माजी आ. शशिकांत खेडेकर यांचे डावपेच उधळून लावत आपणच किंगमेकर असल्याचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी सिद्ध केले आहे. शिंदे गट-भाजपचा सुफडासाफ करून आ. शिंगणे यांनी बाजार समितीवर विजय प्राप्त केला आहे.
जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांच्या निवडणुकांचे निकाल काल, दि. २८ एप्रिलरोजी रात्री उशीरा घोषीत झाले. या निकालावरून नजर फिरवली असता, मेहकरात प्रतापगड़ाला हादरे बसले असले तरी सत्ता राखण्यात यश आले. मात्र यासाठी मोठी दमछाक झाली. खामगावात माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांचा जलवा कायम राहिला, तर देऊळगावराजा व बुलढाणा बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळविले आहे. मलकापूर बाजार समितीत माजी आमदार चैनसुख संचेती यांची एकहाती सत्ता आली. येथे विद्यमान आमदार राजेश एकडे यांच्या पॅनलचा पार धुव्वा उड़ाला.
जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांची निवड़णूक घोषित झाली. पैकी पाच बाजार समित्यांसाठी काल, २८ एप्रिल रोजी मतदान होऊन निकालही काल रात्रीच उशीरा घोषित करण्यात आले. जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मेहकर बाजार समितीत शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव व आ. संजय रायमुलकर यांच्या भूमिपुत्र पॅनलला शिवसेना (ठाकरे) पक्षाचे स्थानिक नेते आशीष रहाटे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने कडवी व चिवट झुंज दिली. एरव्ही गेल्या २५ वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या या बाजार समितीत महाविकास आघाडीने काट्याची टक्कर देत, सात जागा मिळवून बाजार समितीत प्रवेश केला. खा. जाधव व आ. रायमुलकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदेंसोबत चालत्या गाड़ीत बसल्याचा राग बाजार समितीच्या सिलेक्टेड मतदारांनी मतपेटीतून व्यक्त तर केला नाही ना? अशीही चर्चा या निमित्ताने होत आहे. विशेष म्हणजे, खा. जाधव यांचा राजकीय उदय झाल्यापासून येथे विरोधकांचे पूर्ण पॅनलही पाय धरू शकले नाही. परंतु, महाविकास आघाडीने या दोघांच्या या बाजार समिती निवडणुकीत पहिल्यांदाच इतका नाकात दम आणला, की हे दोन्ही नेते बूथचे ठिकाणी ठाण मांड़ून होते. एरव्ही बहुतांश सोसायट्या व ग्रामपंचायती या खा. जाधव व आ. रायमुलकर यांच्या विचारांच्या असतानाही त्यांना अपेक्षित यश मिळविता आले नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत चांगलीच फळाला आल्याचे दिसून आले. आशीष रहाटे यांनी जाधव-रायमुलकर यांच्याविषयी मतदारांच्या मनात असलेली बंडखोरीची रागभावना बरोबर हेरली व ती मतात परावर्तीत केली. तर महाविकास आघाडीचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे, प्रा. नरेंद्र खेडेकर, श्याम उमाळकर, लक्ष्मणदादा घुमरे, राहुल बोंद्रे यांनीही व्यक्तीशः या बाजार समितीत लक्ष घातले होते. पक्षीय बलाबल पाहता येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच, विदर्भ आंदोलन समिती एक तर काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली आहे. तर खा. जाधव यांच्या नेतृत्वातील भूमिपुत्र पॅनलने ११ जागा जिंकल्या आहेत. या पॅनलचे खा. जाधव यांचे भाऊ माधवराव जाधव, बबनराव भोसले, विलास मोहरूत, भगवानराव लहाणे, रेखा सुरेश काळे, लक्ष्मीबाई भगवानराव शहाणे, अरविंद दळवी, महादेव वाघ, ब्रम्हचारी धोंड़गे, दीपक लोढे, अशोक जंजाळ हे ११ उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीचे माजी सभापती अॅड़. सुरेश वानखेडे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, विलास बचाटे, स्वप्नील गाभणे, ईब्राहीम रेघीवाले, संजय वड़तकर व अशोक लंबे हे विजयी झाले आहेत. या निकालामुळे महाविकास आघाडीने अडिच दशकानंतर पहिल्यांदाच मेहकर बाजार समितीत मजबूतपणे पाय रोवले असून, ही खा. जाधव व आ. संजय रायमुलकर यांना धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये माजी सभापती सागर पाटील, माजी उपसभापती विठ्ठलराव तुपेसह दिग्गजांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे.
दुसरीकडे, संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागून राहिलेल्या खामगाव बाजार समितीत माजी आमदार दिलीप सानंदा यांनी एकहाती किल्ला लढवत ५ जागा खेचून आणल्या. येथे भाजपचे विद्यमान आमदार आकाश फुंड़कर यांना अवघ्या तीन जागा मिळाल्या. या तीन जागा जिंकतानाही भाजपच्या नाकीनऊ आले होते. खामगाव जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत बाजार समिती असून, विद्यमान आमदारांना या बाजार समितीत आपला राजकीय करिश्मा दाखवता आला नाही. त्यामुळे त्यांच्यासाठीदेखील धोक्याची घंटा निर्माण झाली आहे. देऊळगावराजा बाजार समितीत माजी मंत्री आ.राजेंद्र शिंगणे यांनी गड़ कायम राखत, एकहाती १५ जागांवर विजय मिळविला. येथे माजी आमदार तथा शिंदे गटात गेलेले शशिकांत खेड़ेकर यांनाही तीन जागावर समाधान मानावे लागले. ही बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी खेडेकर यांनी जोरदार रणनीती आखली होती. परंतु, मतदारांनी त्यांना साथ दिली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडणे त्यांना महागात पडले असल्याची राजकीय चर्चा या निकालानंतर रंगत आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा राहिलेल्या बुलढाणा बाजार समितीत शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार ताकद लावली होती. विद्यमान आमदार संजय गायकवाड व भाजपच्याविरोधात महाआघाडीचे सर्व नेते एकवटले होते. त्यांच्या या मेहनतीला फळ आले असून, १८ पैकी १२ जागा जिंकत एकहाती सत्ता प्राप्त करण्यात महाआघाडीला यश आले आहे. बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी आक्रमक राजकारण करणारे आ. संजय गायकवाड यांना अखेर धोबीपछाड बसली आहे. या निकालाचा आगामी विधानसभा निवडणुकीवरदेखील परिणाम पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मलकापूर बाजार समितीत माजी आ.चैनसुख संचेती यांनी एकहाती विजय मिळवत १६ जागा खेचून आणल्या. येथे आ.राजेश एकड़े यांच्या पॅनलचा पार धुव्वा उड़ाला. काँग्रेस व अपक्ष हे प्रत्येकी एका जागेवर विजयी झाले आहेत.
एकंदरीत दहापैकी पाच बाजार समित्यांचा कल पाहाता, सिलेक्टेड मतदार असतानाही महाविकास आघाडीला चांगला कौल मिळालेला आहे. मेहकर बाजार समिती वगळता, शिंदे गटाला कुठल्याही बाजार समितीत यश मिळालेले नाही. उलट शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नेते, पदाधिकारी व कट्टर शिवसैनिक यांच्यामुळे महाविकास आघाडीला या निवडणुकांत फायदा झाल्याचे दिसून येत आहे. ही बाब शिंदे गटाच्या आमदारांसाठी धोक्याची घंटा ठरणारी आहे.
————-