– शिंदे गटाच्या ११ जागा तर महाविकास आघाडीला मिळाल्या ७ जागा
मेहकर (रवींद्र सुरूशे) – मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीचा अभेद्य असा गड राखण्यात शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना यश आले आहे. शिवसेनेच्या नेतृत्वातील भूमिपुत्र पॅनलने १८ पैकी ११ जागा जिंकून बाजार समितीवर भगवा फडकविला आहे. तर शिवसेनेला महाविकास आघाडीनेदेखील जोरदार टक्कर दिली असून, सात जागांवर धक्कादायक विजय प्राप्त केला आहे. खा. जाधव यांचे बंधू तथा माजी सभापती माधवराव जाधव यांच्या पराभवाचे वृत्त ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सुरूवातीला ऐकीव माहितीवर चालवले होते. परंतु, माधवराव हे विजयी झाल्याने शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे.
मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु, खासदार प्रतापराव जाधव व आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या नेतृत्वात भूमिपुत्र पॅनलने बाजार समितीवर भगवा फडकविला आहे. अत्यंत अतितटीच्या झालेल्या या निवडणुकीत भूमिपुत्र पॅनलने १८ पैकी ११ जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीला सात जागांवर समाधान मानावे लागले. या बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचे अॅड. सुरेशराव वानखेडे यांच्या विजयाने आघाडीची चांगली सुरूवात झाली होती. परंतु, माजी सभापती सागर पाटील पराभूत झाल्यानंतर आघाडीचा आलेख घसरला. त्यातच माधवराव जाधव यांच्या विजयाबद्दल साशंकता व्यक्त केली जात असताना, आपल्या हक्काच्या मतदार संघातील जागा भूमिपुत्र पॅनलने जिंकत ११ जागांवर विजय प्राप्त केला.
एरव्ही गेल्या २५ वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या या बाजार समितीत महाविकास आघाडीने काट्याची टक्कर देत, सात जागा मिळवून बाजार समितीत प्रवेश केला. खा. जाधव व आ. रायमुलकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदेंसोबत चालत्या गाड़ीत बसल्याचा राग बाजार समितीच्या सिलेक्टेड मतदारांनी मतपेटीतून व्यक्त तर केला नाही ना? अशीही चर्चा या निमित्ताने होत आहे. विशेष म्हणजे, खा. जाधव यांचा राजकीय उदय झाल्यापासून येथे विरोधकांचे पूर्ण पॅनलही पाय धरू शकले नाही. परंतु, महाविकास आघाडीने या दोघांच्या या बाजार समिती निवडणुकीत पहिल्यांदाच इतका नाकात दम आणला, की हे दोन्ही नेते बूथचे ठिकाणी ठाण मांड़ून होते. एरव्ही बहुतांश सोसायट्या व ग्रामपंचायती या खा. जाधव व आ. रायमुलकर यांच्या विचारांच्या असतानाही त्यांना अपेक्षित यश मिळविता आले नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत चांगलीच फळाला आल्याचे दिसून आले. आशीष रहाटे यांनी जाधव-रायमुलकर यांच्याविषयी मतदारांच्या मनात असलेली बंडखोरीची रागभावना बरोबर हेरली व ती मतात परावर्तीत केली. तर महाविकास आघाडीचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे, प्रा. नरेंद्र खेडेकर, श्याम उमाळकर, लक्ष्मणदादा घुमरे, राहुल बोंद्रे यांनीही व्यक्तीशः या बाजार समितीत लक्ष घातले होते. पक्षीय बलाबल पाहता येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच, विदर्भ आंदोलन समिती एक तर काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली आहे. तर खा. जाधव यांच्या नेतृत्वातील भूमिपुत्र पॅनलने ११ जागा जिंकल्या आहेत. या पॅनलचे खा. जाधव यांचे भाऊ माधवराव जाधव, बबनराव भोसले, विलास मोहरूत, भगवानराव लहाणे, रेखा सुरेश काळे, लक्ष्मीबाई भगवानराव शहाणे, अरविंद दळवी, महादेव वाघ, ब्रम्हचारी धोंड़गे, दीपक लोढे, अशोक जंजाळ हे ११ उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीचे माजी सभापती अॅड़. सुरेश वानखेडे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, विलास बचाटे, स्वप्नील गाभणे, ईब्राहीम रेघीवाले, संजय वड़तकर व अशोक लंबे हे विजयी झाले आहेत. या निकालामुळे महाविकास आघाडीने अडिच दशकानंतर पहिल्यांदाच मेहकर बाजार समितीत मजबूतपणे पाय रोवले असून, ही खा. जाधव व आ. संजय रायमुलकर यांना धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये माजी सभापती सागर पाटील, माजी उपसभापती विठ्ठलराव तुपेसह दिग्गजांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे.