सोलापूर (संदीप येरवडे) – जल जीवन मिशन योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील कार्यरत असणार्या जवळपास ३५ कंत्राटी कनिष्ठ अभियंता यांना तीन महिन्यापासून पगार देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या कर्मचार्यावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे.
पंतप्रधान यांचे स्वप्न असलेल्या हर घर नळ या योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यात जवळपास ३५ कंत्राटी कनिष्ठ अभियंता यांची नियुक्ती मागील काही दिवसापूर्वी करण्यात आली होती. जेणेकरून जलजीवन मिशन योजनेचे काम सुरळीत पार पाडावे. परंतु एकीकडे शासनाकडून सोलापूर जिल्ह्यासाठी ८०० ते ९०० कोटी रुपयाचा निधी जलजीवन मिशन योजनेसाठी देण्यात आला असताना कंत्राटी कर्मचार्यांच्या हातात मात्र गेल्या तीन महिन्यापासून पैसे दिले नसल्यामुळे या कर्मचार्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, जल जीवन मिशन योजनेचे हे कंत्राटी कर्मचारी इस्टिमेट तयार करणे, एमबी तयार करणे, स्पॉटवर जाणे आदी कामे करतात. परंतु या कर्मचार्यांना एकीकडे शासन पगारीसाठी लांबवित असताना सध्या कायम असणार्या कर्मचार्याकडून मात्र मानसिक त्रास दिला जात आहे.
विशेष म्हणजे, या घेण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचार्यांना जॉब चार्टमध्ये कामाचे स्वरूप देण्यात आले आहे. परंतु अनेक कंत्राटी कर्मचार्यांना शिपायासारखी वागणूक व शिपायाचे काम आणि ऑपरेटरचे काम दिले जात असल्याची ओरड होत आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यासाठी ८०० ते ९०० कोटी रुपयाचा निधी जलजीवन मिशन योजनेसाठी आले असताना यामध्ये होणार्या तक्रारी असतील किंवा येथील काम करणार्या कर्मचार्यांच्या समस्या असतील याबाबत वरिष्ठ पातळीवरील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे लक्ष का देत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माझा स्वतःचा पगार गेले दोन महिन्यांपासून झाला नाही. मार्च एंडिंगमुळे पगारी होण्यास विलंब लागला आहे. तरी पुढील काही दिवसात पगार होईल.
– सुनील कटकधोंड, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा
————-