ChikhaliHead linesVidharbha

मेरा बुद्रूक येथे विजेचा थरार; झाडावर कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही!

मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहेत. तसेच राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. चिखली तालुक्यातील मेरा बुद्रूक येथे वाडी शिवारात भरपावसात पळस पांगरा झाडावर वीज पडली आणि झाडाच्या चिंध्या चिंध्या झाल्या. ही घटना घडली त्यावेळी झाडाखाली किंवा परिसरात व्यक्ती नसल्याने मोठा अनर्थ टळला. येथील जाधव परिवाराने हा थरार अनुभवला आहे.

अवकाळी पावसाच्या काळात वीज पडून दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने सोशल मीडियाद्वारे, वर्तमानपत्राद्वारे सर्व शेतकर्‍यांना कळविण्यात आले होते. ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी झाडाखाली थांबू नये, असे आवाहनसुद्धा करण्यात आले होते. चिखली तालुक्यातील मेरा बुद्रूक येथे दि.२८ एप्रिलरोजी दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी वाडी शिवारातील जाधव यांच्या शेतामध्ये झाडावर वीज कोसळली. विजेची तीव्रता एवढी भीषण होती, की भल्यामोठ्या झाडाचे अनेक तुकडे होऊन २०० ते ३०० फुटापर्यंत झाडाचे तुकडे शेतात विखुरल्या गेले. काही वेळे अगोदर घटनास्थळी संतोष जाधव हे ट्रॅक्टरने शेतीचे काम करत होते.

वीज काेसळून जळालेले झाड.

अचानक सोसाट्याचा वारा आणि जोराचा पाऊस सुरू झाला असता, तिथून ते जवळच असलेले आपल्या काकाच्या निवासस्थानी गेले. तेवढ्यातच प्रचंड कर्कश आवाजासह लख्खप्रकाशात पळस पांगरा झाडावर वीज कोसळली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जाधव परिवाराने या विजेचा घटनेचा थरार अनुभवला. घटनास्थळावरून दोनशे ते तीनशे फुटाच्या अंतरावर श्रीकृष्ण जाधव यांनी राहण्यासाठी बांधलेल्या निवासामध्ये श्रीकृष्ण जाधव, त्यांच्या पत्नी, अण्णा जाधव, संजय जाधव, संतोष जाधव, दिलीप जाधव, अशोक जाधव यांनी पडलेल्या या विजेचा थरारक अनुभव अनुभवला.


प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वेळोवेळी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना तीन-चार दिवसांपासून वातावरण बदलल्यास शेतकर्‍यांनी शेतामध्ये जाऊ नये, किंवा गेले तरी सावधानता बाळगावी, उंच टेकडीवर, झाडापासून दूर राहावे, असा सल्ला वेळोवेळी देत असतानाच दोन दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात वीज पढून मुक्या प्राण्यासह अनेक शेतकर्‍यांनी आपला जीव गमावला आहे. जिल्ह्यात या झालेल्या घटनेपासून शेतकर्‍यांनी विशेष सावधानता बाळगावी, असे आवाहन ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्यावतीने शेतकर्‍यांना करत आहोत. यावर्षी संपूर्ण उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याचे स्वरूप येताना दिसत आहे. त्यामुळे मानवी आरोग्यावरसुद्धा त्याचा गंभीर परिणाम परिणाम होताना दिसून येत आहे. त्यामुळे सर्व शेतकर्‍यांनी सद्या बदललेल्या वातावरणात आपल्या मुक्या प्राण्यासह स्वतःची काळजी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!