शिवसेनेची संपत्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार!
– याचिका दाखल करणार्या वकिलालाही सरन्यायाधीशांनी फटकारले!
नवी दिल्ली (आवेश तिवारी) – शिवसेना (ठाकरे) पक्षाकडे असलेली संपत्ती ही शिंदे गटाला देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत, याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारून काढले आहे. ‘याचिका दाखल करणारे तुम्ही कोण?’, असा सवाल न्यायालयाने याचिकाकर्त्याला केला.
‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यनेते बनले होते. त्यामुळे शिवसेना भवन आणि पक्षनिधी एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात यावा, अशी याचिका वकील आशीष गिरी यांनी १० एप्रिल २०२३ ला सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर आज (२८ एप्रिल) सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा सरन्यायाधीशांनी आशीष गिरी यांना चांगलेच खडसावले. ‘ही याचिका दाखल करणारे तुम्ही कोण?’, असा प्रश्न उपस्थित करत, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी याचिका फेटाळली.
शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्ष व चिन्ह यावर दावा केला होता. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. त्यावर निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल देत, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले. त्यानंतर शिवसेना भवन आणि पक्षनिधी कोणाचा यावरुन चार्चा सुरु झाली होती. दरम्यान, शिंदे गटाकडून यावर दावा करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, वकील गिरी यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेचा आणि शिंदे गटाचा थेट काहीही संबंध नव्हता, असे दर्शविले गेले होते.
सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंना अध्यक्ष म्हणून कायम ठेवले, तर शिवसेना भवन, निधी आणि सर्व शाखा त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात याव्या. तसेच, निकाल लागेपर्यंत निधी वापरण्यावर निर्बंध घालण्यात यावा, अशी मागणी अॅड. आशीष गिरी यांनी याचिकेद्वारे केली होती. परंतु, त्यांच्या मागणीत सर्वोच्च न्यायालयाचा वेळ वाया घालण्यापलिकडे काहीही तथ्य नसल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. शिवसेनेची संपत्ती शिंदे गटाला देण्यात यावी, अशी मागणी करणारे तुम्ही कोण? तुमचे स्थान काय? अशा शब्दांत फटकारत ही याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे निव्वळ सनसनाटी निर्माण करणार्या त्या वकिलाला चांगलाच दणका बसला आहे.
——————-