बुलढाणा/लोणार (जिल्हा प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची हुकुमशाही व मनमानी देशात सुरू आहे. याविषयी कोणी बोलायचेच नाही का? देशात लोकशाही व संविधानाची पायमल्ली होत असल्याचा आरोप करत, या मनमानीविरूध्द काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला असून, न्याय मिळेपर्यंत आता स्वस्थ बसणार नाही, असा इशारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा लोणार तालुका काँग्रेसचे समन्वयक लक्ष्मणराव घुमरे यांनी दिला.
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून आलेल्या आदेशानुसार, केंद्रातील भाजप सरकार व भ्रष्ट अदानी युतीचा पर्दाफाश करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने तालुकास्तरावर पत्रकार परिषदा आयोजित करण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून लोणार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने नुकतीच लोणार येथील अथर्व हॉटेल येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी घुमरे बोलत होते. ते म्हणाले, की काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत उद्योगपती गौतम अदानी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील भ्रष्ट व्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित केला असता त्यांच्याविरोधात षडयंत्र रचून संसद सदस्यत्व रद्द केले जाते. ही कुठली लोकशाही आहे? याविरोधात न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील, असेही घुमरे यांनी सांगितले.
यावेळी सहसमन्वयक तथा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनिकेत मापारी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रा. गजानन मापारी, शहर अध्यक्ष शे.समद, नगराध्यक्ष पूनम पाटोळे, उपनगराध्यक्ष बादशहाखान, माजी सभापती ज्ञानेश्वर चिभड़े, अशोक पोफळे, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष तोफीक कुरेशी, प्रदीप संचेती, नगरसेवक संतोष मापारी, शे.राऊफ, रमजान परसुवाले, सतिश राठोड, अंबादास इंगळे, सुदन इंगळे, शे.जुनेद, शे.सज्जाद, मनीष पाटोळे, शुभम चाटे आदि उपस्थित होते.