चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील एकलारा गावाच्या हर्षल सतीश पुरी याने १७ वर्ष वयोगटातील नेपाळ येथे झालेल्या २०० मीटर धावण्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकावून एकलारा गावासह बुलढाणा जिल्ह्याचा मान उंचावला. त्याच्या या विजयाने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
हर्षल हा विवेकानंद विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय इयत्ता बारावीमध्ये शिकत आहे. त्याचा नॅशनल गेम ट्रायल २०२३ युथ गेम्स कौन्सिल ऑफ इंडिया १७ वर्षे वयोगटातून शेगाव येथे झालेल्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पहिला क्रमांक आला होता. शेगावच्या क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याने त्याची राज्यस्तरावर निवड झाली होती. ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत १७ वर्ष वयोगटातून १०० मीटर धावणे ग्वालियर गोल्ड मेडलिस्ट राज्यस्तरीय स्पर्धेत हर्षल सतीश पुरी याने प्रथम क्रमांक पटकावला. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत १०० मीटर धावण्यामधून प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे नेपाळ येथे इंटरनॅशनल स्पर्धेत त्याची निवड झाली होती.
दिनांक ४ एप्रिल २०२३ रोजी नेपाळ येथे झालेल्या १७ वयोगटातील आंतरराष्ट्रीय २०० मीटर धावण्यामध्ये हर्षल सतीश पुरी याने प्रथम क्रमांक पटकावून एकलारा गावासह जिल्ह्याचा मान देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावला. त्याच्या या कामगिरीने त्याच्या आई-वडिलांसह कुटुंबातील सर्व व्यक्तींनी व गावातील सर्व नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.