Breaking newsHead linesMaharashtraMumbaiPolitical NewsPoliticsWorld update

ईडी, सीबीआय बाजूला करा, मग बघा काडतूस कुठं घुसतो?

– छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान झाला तेव्हा का नाही गौरव यात्रा काढली?

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ‘फडतूस’ गृहमंत्री म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही मी फडतूस नव्हे तर काडतूस, असे प्रत्युत्तर दिले होते. त्यावर ईडी व सीबीआय हेच तुमचे खरे काडतूस आहेत. एकदा त्यांना बाजूला करा मग काडतूस कुठे घुसते हे दाखवतो, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला. गृहमंत्री फडणवीस यांच्या टीकेला खा. राऊत यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस गृहमंत्री झाल्याने महाराष्ट्राची अडचण झाली आहे. ईडी, सीबीआय आहेत म्हणून यांची जीभ तुरुतुरु चालते आहे. ‘सीबीआय आणि ईडी म्हणजे सरकारचे बॉडीगार्ड झाले आहेत, अशी टीका राऊत यांनी यावेळी केली.

खा. राऊत म्हणाले, की उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला अत्यंत सौम्य शब्दात फडतूस म्हटले आहे. तुम्ही स्वत:ला काय काडतूस म्हणता. तुम्ही तर भिजलेले काडतूस आहात. तुमचं खरं काडतूस कुठलं असेल तर सीबीआय आणि ईडी आहे. म्हणून तुमची मस्ती आणि चरबी आहे. ही ईडी आणि सीबीआय बाजूला ठेवून या. मग काडतूस कुठं घुसतं ते आम्ही दाखवतो, असे आव्हानच संजय राऊत यांनी दिले. तसेच देवेंद्र फडणवीस मिस्टर झुके आहेत. ज्याला दोन शब्द नीट बोलता येत नाही, अशा माणसाच्या बाजूला बसला आहात. हे झुकणच आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना खा. राऊत म्हणाले की, ‘कोण बावनकुळे तुमचं तिकीट का कापलं? तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला तिकिट दिलं नाही. तुम्ही वीज खात्यात काय केलं होतं. ते दिल्लीपर्यंत आलं होतं.’ राज्यात याआधी इतर महापुरुषांबद्दलही वादग्रस्त वक्तव्ये झाली, तेव्हा गौरव यात्रा का काढली नाही यावरूनही संजय राऊत यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ‘छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटलांवरती कधी गौरव यात्रा का काढली नाही या काडतूसांनी’, असा प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला. तुम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाहीत. चंद्रकांत पाटील महान गृहस्थ आहेत. गौतम अदानीवर बोलू दिलं जात नाही, डीग्रीवर बोलू दिलं जात नाही. चीन तिकडे घुसखोरी करत आहेत. त्याच्यावर बोलत नाहीत. ते काडतूसे तिकडे पण घाला, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.


शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. सुषमा अंधारे यांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘झुकेगा नही घुसेगा साला, हा डायलॉग भारीच होता. पण २०१६ पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नीवर स्पाईंग करत होती, हे तुम्हाला ७ वर्षे कळले नाही. आणि तुम्ही घुसायच्या बाता कराव्यात हे काय पटत नाही राव.’
——————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!