सोलापूर (संदीप येरवडे) – कांदा उत्पादक शेतकर्यांना शासनाने प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान जाहीर केले आहे. परंतु या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी सातबारा उतार्यावर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. ही अट घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शेतकर्यांच्या सातबारा उतार्यावर कांदा पिकाची नोंदच नाही. त्यामुळे अशा शेतकर्यांना कांदा अनुदानाचे अर्ज भरण्यास अडथळा निर्माण होत आहे.
कांदा उत्पादक शेतकर्यांचा कांदा यंदा कवडीमोल दराने विक्री करावा लागला होता. हे पाहून सरकारने कांद्याला प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले. त्यामुळे सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या दोन दिवसापासून कांदा अनुदानाचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दक्षिण सोलापूर तालुका, उत्तर सोलापूर तालुका तसेच आजूबाजूच्या तालुक्यातून व तुळजापूर तालुक्यातील शेतकरी कांदा अनुदानाचे अर्ज भरून देण्यासाठी सोलापूरच्या बाजार समितीमध्ये गर्दी केली आहे. या शेतकर्यांना कांदा अनुदानाचे अर्ज व्यवस्थित भरता यावे, तसेच गर्दी झाली तरी उन्हाचा परिणाम होऊ नये, यासाठी सोलापूर बाजार समितीने मंडपाची सोय केली आहे. तसेच खाली देखील मँट टाकले आहे. परंतु अनेक शेतकर्यांना एकच गोष्टीचा अडथळा होत आहे तो म्हणजे सातबारा उतार्यावरील तलाठी भाऊसाहेबांनी नोंदच केली नाही. त्यामुळे कांदा अनुदानाचे अर्ज भरण्यास अडथळा निर्माण होत आहे. बरेच शेतकरी कांदा अनुदान जाहीर केल्यामुळे तलाठी भाऊसाहेबांना सातबारा उतार्यावर कांदा नोंद करावी, अशी विनंती केली. तरी तलाठी भाऊसाहेब ऑनलाईन साईड बंद असल्याचे कारण देत आहेत. त्यामुळे हजारो शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तर मागील दोन दिवसापूर्वीच दक्षिण सोलापूर तालुक्याची आमसभा झाली. त्या आमसभेमध्ये माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाषबापू देशमुख यांना दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकर्यांनी कांदा अनुदानासाठी सातबारा उतार्यावरील पिकाची नोंद अशी रद्द करण्याची मागणी केली. परंतु तरीही या प्रश्नानाची सोडवणूक झाली नसल्यामुळे शेतकर्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. कांदा अनुदान अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख शासनाने २० एप्रिल पर्यंत दिली आहे. परंतु सातबारा उतार्यावर जर का कांदा नोंद झाली नाही तर कांदा उत्पादक शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.
कांदा अनुदानासाठी ही कागदपत्रे लागतात
– कांदा विक्री केलेली पावती
– आधार कार्ड, बँक पासबुक
– सातबारा उतार्यावर कांदा नोंद असणे आवश्यक, आठ अ
—————