उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांना ८४ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी CBI कडून क्लिन चीट
मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ८४ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी श्रीधर पाटणकर यांच्याविरोधात सबळ पुरावे नसल्याचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयने कोर्टात सादर केला. हा रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला असल्याने पाटणकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
व्यावसायिक श्रीधर पाटणकर यांच्यावर मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने कारवाई करत त्यांची मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर सीबीआयकडूनही पाटणकर यांच्याविरोधात कारवाईचा फास आवळला जाण्याची शक्यता होती. मात्र ईडीच्या विरोधानंतरही सीबीआय विशेष न्यायालयाने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेला रिपोर्ट स्वीकारला आहे. पाटणकर यांच्याविरोधात सबळ पुरावे नसल्याचं सीबीआयने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
राज्यात २०१९ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपमधील राजकीय संघर्षाने टोक गाठले होते. भाजप नेत्यांच्या आरोपानंतर शिवसेनेच्या विविध नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात आली होती. हा कारवाईचा फास थेट ठाकरे कुटुंबातील व्यक्तींपर्यंतही पोहोचला होता. त्यातच थेट उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्यावरही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली होती.
मनी लॉण्ड्रिंग प्रकरणाने ईडीने श्रीधर पाटणकरांच्या ठाणे येथील निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिका जप्त केल्या होत्या. जवळपास साडे सहा कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली होती.