खामगाव – कर्जबाजारीपणामुळे ४३ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. ही घटना १ जुलै रोजी कोलरी येथे उघडकीस आली.
खामगाव तालुक्यातील कोलरी येथील सुनिल गुलाबराव कोरडे वय ४३ यांच्याकडे अडीच एक्कर शेती आहे तर ते वडिलांची शेती सुध्दा वहिती करतात. सुनिल कोरडे हे याच शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असत. मात्र गेल्या काही वर्षापासून सततची नापिकी व शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने सुनिल कोरडे यांनी बँकेचे कर्ज घेतले. त्यांच्यावर स्टेट बँक कृषी शाखा खामगावचे ३ लाख आहे. बँकेचे कर्ज फेडावे? की कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा या विवंचनेत सुनिल कोरडे हे नेहमी राहत. याचे विवंचनेतून सुनिल कोरडे हे ३० जून रोजी सकाळी १० वाजता घरून निघून गेले व ते परत आलेच नाही. यावेळी त्यांनी स्वतच्या शेताजवळ विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. सुनिल कोरडे हे घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते कुठेही मिळून आले नाही. दरम्यान १ जुलै रोजी सकाळी ९ च्या सुमारास बकऱ्या चारणाऱ्यास सुनिल कोरडे यांचा मृतदेह त्यांच्या शेताजवळ आढळून आला. घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. तर या प्रकरणी मारोती कोरडे यांच्या फिर्यादीवरून खामगाव ग्रामीण पोस्टेला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती मृतकचा मोठा भाऊ मारोती गुलाबराव कोरडे यांनी दिली. तर मृतक सुनिल कोरडे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, २ बहिणी, पत्नी, मुलगा व मुलगी असा आप्त परीवार आहे.