सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील विविध विषयांच्या सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता (सेट) परीक्षा रविवार, 26 मार्च 2023 रोजी होणार आहे. त्यामध्ये सोलापुरातील एकूण 14 केंद्रांवर 6 हजार 322 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केल्याची माहिती येथील केंद्राचे संपर्क प्रतिनिधी तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. विकास घुटे यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ केंद्र क्रमांक 20 अंतर्गत सोलापूर शहरातील संगमेश्वर कॉलेज, डी. बी. एफ. दयानंद कॉलेज, वालचंद आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, हिराचंद नेमचंद कॉलेज, कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालय, श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक, एस. ई. एस. पॉलिटेक्निक, सोशल कॉलेज, एन. बी. नवले सिंहगड कॉलेज, केगाव, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, भारती विद्यापीठाचे अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ, सोलापूर आणि विद्यापीठ कॅम्पसमधील संगणकशास्त्र संकुलात ही परीक्षा होणार आहे.
या सेट परीक्षेसाठी एकूण दोन पेपर असतील. पहिला पेपर सकाळी दहा ते अकरा या वेळेत व दुसरा पेपर 11.30 ते 1.30 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी उपस्थित राहावे. जे विद्यार्थी पेपर एकला अनुपस्थित राहतील, त्यांना पेपर दोनसाठी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येणार नाही. परीक्षेसाठी प्रवेशपत्र व मूळ ओळखपत्र आवश्यक असून त्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेत बसता येणार नाही. सेट परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र उमेदवाराच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दोन तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन संपर्क प्रतिनिधी डॉ. विकास घुटे यांनी केले आहे.