– म्हणाले, झूकेंगे नही – चिखलीत काँग्रेस रस्त्यावर, मोदी सरकारचा तीव्र निषेध
बुलढाणा (प्रशांत खंडारे)- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रकार म्हणजे लोकशाहीचा खून आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी दिली. लोकसभा सचिवालयाच्या निर्णयानंतर चिखलीत काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. या टोकाच्या निर्णयाने केंद्रातील भाजपा सरकारने लोकशाहीचा खून केला, असा आरोप राहुल बोंद्रे यांनी केला. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली हा देशातील लोकशाहीसाठी काळा दिवसच ठरला आहे, असेही त्यांनी म्हटले. आज २४ मार्च रोजी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याचे वृत कळताच चिखलीतील काँग्रेसप्रेमी चक्क रस्त्यावर उतरले. यावेळी केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकारविरूध्दात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
राहुल गांधी यांनी सन २०१९ मध्ये ‘‘सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते? ’’ असे वक्तव्य कनार्टकच्या एका सभेत केले होते. या विधानाचा संदर्भ घेवून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर नुकतीच त्यांना या प्रकरणी दोन वर्षाची शिक्षा गुजरातच्या एका न्यायालयाने सुनावली. त्यापोठोपाठ आज त्यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याचा तुघलकी निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत काढण्यात आलेल्या भारतजोडो यात्रेला लाखो करोडो देशवासीयांकडून मिळालेला अभुतपूर्व प्रतिसाद पाहता केंद्रासह भाजपच्या पायाखालची वाळू सरकरली. त्यामुळे भाजपाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याची कृती म्हणजे जाणीवपूर्वक व ठरवून केलेले षडयंत्र व संविधानावर हल्ला असल्याची प्रतिक्रिया यावेळी राहुल बोंद्रे यांनी दिली.
महाविकास आघाडीचा चिखलीत २७ मार्चरोजी तालुका कृषी कार्यालयाला घेराव!
सोयाबीन व इतर शेतमालाचे बाजार भाव वाढवून मिळावे तसेच सरकारच्या शेतकरी अहिताच्या धोरणांमुळे रखडलेल्या पीकविम्याची रक्कम व खरीप हंगामातील पीक नुकसानाची भरपाई रक्कम शेतक-यांना त्वरीत देण्यात यावी. या व शेतक-यांच्या इतर मागण्याकरीता महाविकास आघाडीच्यावतीने सोमवार, २७ मार्च रोजी घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. या घेराव आंदोलन प्रसंगी मतदार संघातून शेतकरी, शेतमजूर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले आहे.