सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी विधानसभा आणि रस्त्यावरची लढाई दोन्हीकडे मी तुमच्यासोबत आहे. विधानसभेत किती आमदार या प्रश्नाच्या बाजूला आहेत आणि किती विरोधात आहेत, असा सवाल मी उपस्थित करणार आहे. त्यामुळे कर्मचार्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचे आश्वासन सोलापूर (शहर मध्य)च्या आमदार प्रणिती शिंदे यांनी दिले.
महाराष्ट्रातील सर्व कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व विभागातील जवळपास ७० शिक्षक, शिक्षकेत्तर, कर्मचारी संघटनांच्या पदाधिकार्यांची महत्वाची बैठक शासकीय विश्रामगृह सात रस्ता सोलापूर येथे झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी तर शहराध्यक्ष चेतन नरोटे उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला संघटना प्रतिनिधी म्हणून श्रावण बिराजदार, रमेश चौगुले, महेश सरवदे, सूर्यकांत डोगे, रवि नष्टे, विजय भांगे, रुथ कलबंडी, बाळकृष्ण पुतळे, सुजित काटमोरे, रविंद्र जेटगी, अविनाश गोडसे, धनंजय गायकवाड, आरती माढेकर, रिजवान शेख यांनी भूमिका मांडली. जुनी पेन्शन हा कर्मचार्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून या प्रश्नावर सर्व विभागातील सर्व संघटनांनी एकत्र येऊन मोर्चाचे नियोजन करावे असा आग्रह उपस्थितांनी धरला. १४ मार्चच्या संपात सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी १००ज्ञ् सहभागी होतील अशी ग्वाही विविध विभाग प्रमुखांनी दिली. सकाळी ११ वाजता चार पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर या मार्गावर होणार्या पेन्शन मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
आजच्या बैठकीला शिक्षण विभाग, आरोग्य, कृषी, महसूल, पाटबंधारे, सिंचन, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद कर्मचारी, पोलिस कार्यालयीन कर्मचारी, विद्यापीठ विभाग, महानगर पालिका कर्मचारी संघटना, आय टी आय, शासकीय तंत्रनिकेतन, सफाई कर्मचारी संघटना, उच्च शिक्षण विभाग प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकार्यांनी घेतलेली जुन्या पेन्शनची शपथ विशेष ठरली. स्वतः आमदार यांनी एकच मिशन, जुनी पेन्शनच्या घोषणांनी वातावरण पेन्शनमय केले. कर्मचारी एकजुटीचा विजय असो, हम सब एक है, एकच मिशन जुनी पेन्शन या घोषणांनी परिसर दणाणून गेले होते.