– विधीज्ञ जितेंद्र जैन यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्यांना निवेदन
बुलढाणा (खास प्रतिनिधी) – सुसाट वाहनांना ब्रेक नाहीच! त्यामुळे कधी कुठे अपघात होईल हे सांगता येत नाही. रस्ते अपघातांची संख्या लक्षणीय आहे. बुलढाणा येथील धाड नाका ते सोसायटी पेट्रोल पंपापर्यंत सर्क्युलर रोडवर वाहने वेगाने धावतात. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी या मार्गावर जागोजागी गतिरोधक बांधण्यात यावे, आणि या रस्त्यावरील वाहतूक हायवे वरून वाढविण्यात यावी, अशी मागणी विधीज्ञ जितेंद्र जैन यांच्यासह नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना आज केली आहे.
बुलढाणा शहरातील सर्क्युलर रोड, धाड नाका ते सोसायटी पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता हा अतिशय वर्दळीचा झालेला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असणार्या अनेक शाळांचे विद्यार्थी पायी, सायकलवर तसेच टू-व्हीलर वर ये- जा करीत असतात. शाळेत जाताना असो, शिकवणी वर्गाला जाणारा असो किंवा अभ्यासिकेला जाणारे.. असे हजारो विद्यार्थी, त्यांना सोडणारे पालक, पेन्शनधारक व इतरही लोकांची वर्दळ असते.
रस्त्यावर काही वाहन चालक टू-व्हीलर, फोर व्हीलर वा ट्रक, टिप्पर असे अनेक वाहन वेगाच्या मर्यादा ओलांडुन भरधाव सुसाट वेगाने धावतात. या रस्त्यावर कोठेही गतिरोधक नसल्यामुळे वाहने सुसाट धावताना दिसत आहे. त्याच रस्त्यावरून अकोला, नागपूरला भाजीपाला नेणारे छोटे वाहन वा मोठे वाहन असो वेगाची मर्यादा न पाळता भरधाव धावत आहे. हजारो लोकांना दररोज आपला जीव मुठीत घेऊनच रस्त्यावरून जाणे येणे करावे लागत आहे. मध्यंतरी दोन-चार अपघातही रस्त्यावर घडले व काहींना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे वेगाला किंवा ट्राफिकला मर्यादा घालाव्या, या रस्त्यावरील प्रत्येक चौकात गतिरोधक टाकावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जितेंद्र नवलचंद जैन, आकाश मोहन जाधव, सुरज बन्सी निर्मल, आनंद विजय सोनार, गणेश नाशिकराव फेपाले, उदय रामकृष्ण जाधव, सुजीत जाधव, आनंद बाबुराव सोनार, अशोक पोदार, सागर राजकुमार देशमुख आदींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहे.
——————-