KARAJATPachhim Maharashtra

कर्जत शहरातील पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था बंद; आ. रोहित पवार यांनाच लक्ष घालावे लागणार का?

कर्जत (आशीष बोरा) – कर्जत शहरात सर्वसामान्य जनतेच्या सोईसाठी आ. रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड़ एकात्मिक विकास संस्थेसह शासनाच्या निधितून उभारलेल्या पिण्याच्या पाण्याच्या अद्यावत व्यवस्था अनेक ठिकाणी उभारण्यात आल्या. मात्र दैनंदिन देखभालीअभावी यातील अनेक व्यवस्था काही महिन्यांपासून बंद अवस्थेत असून, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर याकडे कोणी लक्ष देईल का, असा प्रश्न उभा राहत आहे.

कर्जत शहरात आ. रोहित पवार यांनी अनेक ठिकाणी नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती, त्यावर मोठ्या प्रमाणात खर्चही केला होता. याशिवाय नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक उमेदवारांनी ही आपल्या प्रभागात पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारल्या होत्या. निवडणुका संपताच काही महिन्यात हळुहळु अनेक ठिकाणच्या उभारलेल्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था बंद करण्यात आल्या, अथवा लक्ष न दिल्याने बंद पडल्या आहेत. याबाबत जनतेमध्ये दबक्या आवाजात चर्चा असली तरी उघडपने मात्र यावर कोणीच बोलायला तयार नाही ही शोकांतिका आहे.

आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नाने नगर विकास विभाग अंतर्गत ताशी १००० लीटर क्षमतेचे जलशुध्दीकरण सयंत्र बसविण्यात प्रत्येकी ७ लक्ष रुपये खर्च करून शहरातील सिद्धार्थ नगर, अक्काबाई नगर, राजीव गांधी नगर, अण्णाभाऊ साठे नगर, व कापरेवाड़ी वेस, अशा पाच ठिकाणी बसविण्यात आले. या व्यवस्थेचे उद्घाटन व लोकार्पण आ.रोहित पवार यांच्या हस्ते दि. २९/१०/२०२१ रोजी संपन्न झाले. तर आ. रोहित पवार यांच्याच कर्जत जामखेड़ एकात्मिक विकास संस्थेमार्फत सीएसआर फंडातून कर्जत शहरात बाजारतळ या ठिकाणी लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची फ़िल्टर व्यवस्था उभारली. या सहा ठिकाणाशिवाय अनेक प्रभागात इच्छुकांनी पुढाकार घेऊन स्वतंत्र मोफत पाणी मिळण्यासाठी व्यवस्था उभारल्या होत्या. शुद्ध पिण्याचे पाणी लोकांना मिळावे या उदात्त हेतुने सुरु केलेल्या यंत्रणाचा आढावा घेतला असता, यातील एखादी सोडली तर सर्व बंद पडल्या आहेत. वैयक्तिक सुरु केलेल्या व्यवस्थाही बंद पडल्याचे पहावयास मिळत आहेत. याबाबत सर्व सामान्य माणसांमध्ये मोठी खदखद असताना उघडपणे कोणीही बोलायचे धाडस करत नाहीत, मात्र या सर्वाचा रोष थेट मुख्य नेतृत्वावर जातो याकडे मात्र कोणी ही गांभीर्याने पाहत नाही हे विशेष.

आमदार हे शहर वा मतदार संघाची गरज पाहून त्यासाठी निधी आणन्याचे, उभारण्याचे काम करत असतात त्यांनी आणलेल्या निधीचा योग्य वापर करण्याचे, केलेल्या कामाची देखभाल करन्याचे, व चांगले काम करून घेण्याची जबाबदारी स्थानिक पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी पार पाडणे आवश्यक असते. मात्र अनेक बाबतींत हेच नेमके होताना दिसत नाही. त्यामुळे अशा प्रत्येक प्रश्नांना जनतेकडून थेट आमदारांनाच जबाबदार धरले जाते. त्यामुळे या ही छोटया प्रश्नाकडे आमदार रोहित पवार अथवा आ. राम शिंदे यांनीच लक्ष द्यावे, अशी अपेक्षा जनतेला धरावी लागत आहे. आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर या सर्व यंत्रणा सुरु व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे. याबाबत नगर पंचायतचे मुख्याधिकारी लांडगे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!