Breaking newsHead linesPolitical NewsPoliticsWomen's WorldWorld update

सोनिया गांधी यांचे सेवानिवृत्तीचे संकेत!

– भारत जोडो यात्रेनंतर सेवानिवृत्त होण्याची हीच योग्य वेळ – सोनिया गांधी
– रायपूर येथे काँग्रेसचे ८५ वे राष्ट्रीय अधिवेशन

रायपूर (विशेष राजकीय प्रतिनिधी) – केंद्र सरकार व आरएसएसने सर्व स्वायत्त एजन्सीजवर कब्जा मिळवला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी नव्हे तर आपल्या ठरावीक मित्रांसाठीच सत्ता चालवित आहेत, असा घणाघाती आरोप काँग्रेसच्या नेत्या व संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला. रायपूर येथील अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या ८५ व्या राष्ट्रीय अधिवेशनात त्या बोलत होत्या. कालपासून या अधिवेशनाला सुरूवात झाली असून, देशभरातून काँग्रेस प्रतिनिधी या अधिवेशनासाठी रायपूरमध्ये दाखल झालेले आहेत. आपल्या भाषणादरम्यान सोनिया गांधी यांनी सक्रीय राजकारणातून सेवानिवृत्तीचे संकेतही दिलेत.

सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात भारत जोडो यात्रेद्वारे देशभर पदयात्रा करून देश जोडण्याचे काम करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे जोरदार कौतुक केले. ज्या पद्धतीने राहुल यांनी लोकांच्या जवळ जाऊन त्यांना दिलासा दिला. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या, हे कार्य खूपच प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे. आज संपूर्ण देश काँग्रेसच्या विचारधारेशी नव्याने जुळला आहे व देशवासीयांना आजच्या विपरीत परिस्थितीत पुन्हा एकदा काँग्रेसचा आधार वाटू लागला आहे. आपल्या सेवानिवृत्तीचे संकेत देताना त्या म्हणाल्यात, की भारत जोडो यात्रेसारख्या सर्वोत्तम उपक्रमासारखा उपक्रम माझ्या सेवानिवृत्तीसाठी दुसरा असूच शकत नाही. यावेळी सोनियांनी, भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले. भाजप सरकारला आता सक्तीनेच निपटावे लागेल व लोकांना तातडीने आधार द्यावा लागणार आहे. भाजपच्या सत्ताकाळात अल्पसंख्यांक, महिला, दलित-आदिवासी हे सर्व संकटात सापडले आहेत. भाजप द्वेषाच्या आगीत तूप ओतण्याचे काम करत आहे. सद्याची परिस्थिती देशासाठी आव्हानात्मक असून, काँग्रेस पक्षाला आता देशवासीयांसाठी नव्याने लढा उभा करावा लागणार आहे. भाजप व आरएसएसने सर्व स्वायत्त संस्थांचा ताबा घेतला असून, देश मोठ्या संकटात असल्याचे सोनिया गांधी यांनी सांगितले.
——————-

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. रायपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली आहे. सोनिया गांधींची या घोषणेमुळे त्या राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत देत आहेत. यावेळी सोनिया यांनी भारत जोडो यात्रेचा संदर्भ देत Congressशी जनतेचा संबंध जिवंत झाल्याचे सांगितले. सोनिया गांधी म्हणाल्या, काँग्रेसने लोकशाही मजबूत केली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली आपण चांगले सरकार दिले असे म्हणत सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंह यांच्या कार्याचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!