बुलढाणा (खास प्रतिनिधी) – वाळूमाफियांची दादागिरी सर्वश्रुत आहे. अशाच अवैध वाळू उपसासंदर्भात विचारणा केल्याप्रकरणी महसूल पथकाला लोटपोट करून शासकीय कामात अडथळा आणल्यामुळे चौघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. २४ फेब्रुवारी रोजी हा प्रकार बुलढाण्यात उघडकीस आला.
बुलढाणा तहसीलदार रूपेश खंडारे महसूल पथकासमवेत अवैध गौण खनिज तपासणीसाठी २४ फेब्रुवारीला रात्री ११ वाजेच्या सुमारास जात होते. यावेळी त्यांच्यासोबत मंडळ अधिकारी अशोक शेळके, तलाठी गोपाल राजपूत, तलाठी, अतुल झगरे, प्रभाकर गवळी हे हजर होते. तपासणीदरम्यान मौजे येळगांव येथील बुलढाणा ते चिखली रोडला लागून असलेल्या काबरा ले-आऊट मध्ये टिप्पर क्रमांक एमएच २८-बीबी-४५६६ आढळून आले. पथकाने सदर टिप्परची तपासणी केली असता त्यामध्ये ३ ब्रास रेती आढळून आली. सदर रेतीचा वाहतुक परवाना आहे किंवा नाही याची विचारणा वाहनचालक संजय मोरे याचेकडे कली असता, संजय मोरे याने सांगीतले की, त्याच्याकडे वाळूचा वैध परवाना नाही. त्यावरून चालक संजय मोरे याला सदर टिप्पर शहर पोलिस स्टेशन बुलढाणा येथे घेण्यास सांगीतले. मात्र त्याने असे करण्यास नकार दिला. व पथकातील सदस्य तलाठी गोपाल राजपूत व अतुल झगरे यांचेशी हुज्जत घातली व त्यांना लोटपाट केली. व आपले टिप्पर बुलढाणा शहराचे दिशेन घेऊन पळाला.
महसूल पथकाने टिप्परचा पाठलाग करत सदर टिप्परला बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर मुख्य रस्त्यावर अडविले. या पथकाने टिप्पर चालक संजय मोरे याला वाहन शहर पोलीस स्टेशनच्या आवारात घेण्याची सुचना केली. मात्र त्याने तसे करण्यास नकार दिला. त्यावेळी तेथे टिप्पर मालक गणेश लक्ष्मण वाघ व एक अनोळखी व्यक्ती आले. व त्यांनी टिप्पर ठाण्यात घेण्यास विरोध दर्शविला. उलट त्यांनी महसूल पथकाशी हुज्जत घातली. त्यांच्या सोबत आलेला अनोळखी व्यक्ती स्वतः टिप्परच्या ड्रायव्हींग शिटवर बसला व त्याने वाहन सुरू केले, संपुर्ण रेती ठाण्यासमोर रस्त्यावर सांडवून दिली व भरधाव वेगाने वाहन पळवून घेऊन निघून गेला. प्रत्यक्षात सदर कारवाई ही अवैध गौणखनिज संदर्भातील शासकिय कार्यवाही होती. मात्र सदर कार्यवाहीला वाहन चालक संजय मोरे, वाहन मालक गणेश वाघ व इतर एक व्यक्ती याने अडथळा निर्माण केला व पथकातील दोन सदस्याला लोटपाट केली तसेच रेती मुख्य रस्त्यावर टाकून इतर व्यक्तीच्या जिवीतास धोका निर्माण केला. तहसीलदार रूपेश खंडारे यांच्या तक्रारीवर टिप्पर मालक गणेश लक्ष्मण वाघ, वाहन चालक संजय मोरे व १ अनोळखी व्यक्ती यांचेवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी टिप्पर चालक गणेश वाघ याला अटक केली आहे.