मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी २४ फेब्रुवारी रोजी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भेट घेतली. या भेटीत तुपकरांनी ११ फेब्रुवारी रोजी बुलढाण्यात आंदोलनादरम्यान शेतकर्यांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची वस्तुस्थिती ना.फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देत, उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सोयाबीन-कापूस दरवाढ, पीकविमा व अतिवृष्टीच्या मदतीसाठी रविकांत तुपकर गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलने करीत आहेत. ११ फेब्रुवारी रोजी त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. शांततेत चालू असलेल्या या आंदोलनादरम्यान पोलीसांनी आंदोलन दडपण्यासाठी शेतकर्यांवर अमानुष लाठीचार्ज केला होता. तसेच तुपकर व सहकार्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रविकांत तुपकर व सहकार्यांना ६ दिवस कारागृहात रहावे लागले होते. कारागृहातुन सुटल्यावर पत्रकार परिषदेत पोलीसांनी केलेला लाठीमार हा पूर्व नियोजित कट असल्याचा आरोप रविकांत तुपकरांनी होता. त्यानंतर आता त्यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.