बुलढाणा (खास प्रतिनिधी) – अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ठगी कंपण्यांविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सहसचिव ऋषीकेश म्हस्के पाटील यांनी या विशाल मोर्चाचे नेतृत्व केले.
गरिमा ग्रुप ऑफ कंपनीज, गरिमा रिअल इस्टेट अँड अलाईड लि. , गरिमा होम्स अँड फार्म हाऊसेस लि., पार्टनर मल्टीस्टेट कंपनी लि. क्रे. सोसायटी, मैत्रेय ग्रुप, जीवन समृद्धी, पीएसीएल, रायझिंग लाईफ प्रा. लि., केबीसी, सहारा ग्रुप, शेकडो ठग कंपन्या आणि इतर १०८ खाजगी सोसायट्यांनी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची फसवणूक केली आहे. जिल्हयातील कित्येक नागरिकांनी आपले कष्टाचे पैसे या कंपन्यांमध्ये गुंतवले. अधिक रक्कम परत मिळेल अशी त्यांना आशा होती. मात्र लोकांची फसवणूक झाली.दरम्यान २४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सहसचिव ऋषीकेश म्हस्के यांच्या नेतृत्वात विशाल धडक मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शालिग्राम गवई, प्रल्हाद मोरे, विजय खरे, दिनेश जाधव, अफसर शाह, राजीव जाधव, प्रदीप सावळे, विश्वनाथ गव्हाणे, अशोक शेळके, प्रभाकर भवर, दिलीप मोरे, अनिल माने, जगदीश तेलंग, विनोद गवळी, श्रीराम नवले, सोपान वाघमारे, गणेश यंगड यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
आमच्या संयमाचा अंत पाहु नका- ऋषीकेश म्हस्के
नागरिकांच्या कष्टाचा पैसा ठगी कंपन्यांनी घशात घातला. अनेकांनी आपली आयुष्याची जमापुंजी यामध्ये गुंतवली. जादा रक्कम तर मिळाली नाहीच. मात्र हक्काचा पैसाही परत मिळालेला नाही. त्यामुळे जगावं कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. शासनाला वेळोवेळी निवेदन देण्यात आले. परंतु अद्याप नागरिकांची जमापुंजी परत देण्यासंदर्भात कुठलीच हालचाल झालेली नाही. शासनाने आम्हाला लवकर न्याय द्यावा. आमच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सहसचिव ऋषीकेश म्हस्के यांनी दिला.