कर्जत तालुक्यातील रस्त्यासाठी 28 कोटी मंजूर – खासदार डॉ.सुजय विखे
कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांकरीता खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे २८ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. या निधीच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात रस्ते विकासाचे जाळे निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील रस्त्यांच्या विकास कामांकरीता खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यास प्रशासकीय स्तरावर मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २५ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या मध्ये प्रामुख्याने कोरेगांव-अळसुंदे (सटवाई मार्गे) शेगुड रस्ता, नांदगाव ते राक्षसवाडी, टाकळी खंडेश्वरी-थापलींग-पाटेगांव, मिरजगांव-शिवाचामळा ते रवळगांव, खेड ते मानेवाडी-शिंपोरा रस्ता, नवसरवाडी ते निबोंडी रस्ता, प्रजीमा ६६ ते रेहेकुरी ते प्रजीमा ११५ रस्ता, टाकळी खंडेश्वरी ते खंडाळा ते शिंदेवाडी ते कापरेवाडी, जलालपूर ते ताजु या महत्वपूर्ण मार्गांच्या विकासाकरीता माजी मंत्री आ.राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्या रस्त्यांच्या कामांनाही मंजुरी मिळाल्याचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले.
रा.मा ५४ –राशीन-अळसुंदे-निंबे-खातगाव व चापडगाव या मार्गाकरीता अर्थसंकल्पीय तरतुदीतून २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने हा मार्ग आता दळणवळणासाठी नव्या स्वरुपात विकसीत होणार असल्याचे खासदार डॉ.विखे पाटील म्हणाले. जिल्हा नियोजन समितीतून अळसुंदे ते देमनवाडी, चांदे बुद्रूक ते शिर्के वस्ती, तिखी ते कोकणगांव, देशमुखवाडी ते बरबडे वस्ती, भोसे ते जावळे वस्ती, कोरेगाव ते गलांडेवाडी, खातगाव ते आटोळे वस्ती, राशीन ते जिराफवस्ती, तरडगांव ते मदनेवस्ती, मुळेवाडी ते मुळेवस्ती या रस्त्यांच्या कामासाठी १ कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंजुर केला असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व रस्त्यांच्या कामांसाठी निधी मिळावा म्हणून माजीमंत्री आ.राम शिंदे यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील रस्त्यांच्या कामांना गती मिळत असल्याचे त्यांनी आवर्जुन नमुद केले आहे.