चिखली/नागपूर (प्रतिनिधी) – आपल्या विविध मागण्यांसाठी संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्यावतीने संस्थापक अध्यक्ष प्रशांत जी देशमुख यांच्या नेतृत्वात नागपूर विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यासह राज्यभरातून तसेच इतर राज्यातील शेकडो वाहन चालक मालक या मोर्चात सहभागी झाले होते. विविध मागण्या, समस्यांसह वाहन चालक मालकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात हा मोर्चा निघाला होता.
या मोर्चाने पुढीलप्रमाणे मागण्या सरकार दरबारी मांडल्या आहेत. मनमानी पद्धतीने करण्यात येत असलेली कारवाई बंद करावी, वाहन चालकांना संघटीत कामगाराच्या धर्तीवर सुविधा द्याव्या, हायवेवर आरटीओ पोलीस, पोलीस यांच्याकडून मिळणारी अन्यायकारक वागणूक थांबवावी, टॅक्सी प्रवाशांची संख्या वाढवून देण्यात यावी, एका दिवशी दोन ऑनलाईन ई चलान देणे बंद करावे, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात वाहतूक पोलिसाकडुन दररोज एका गाडीवाल्याकडून ५००/१००० रुपयांची होणारी लूटमार थांबवावी, यासह विविध मागण्यांसाठी संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्यावतीने प्रशांत देशमुख यांच्या नेतृत्वात शेकडो वाहन चालक मालक यांना घेऊन यशवंत स्टेडियम नागपूर येथून विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये बुलडाणा जिल्हा अध्यक्ष सतीश गवते, चिखली तालुका अध्यक्ष उमेश गावंडे, अमोल भारती, संजय ठेंग, विशाल धुमाळ, सोमनाथ तायडे, विजय पाटील, पंकज जाधव, विशाल गायकवाड, विठ्ठल कापसे, रमेश खेडेकर, सुनील देशमुख, राजू सुर्वे, नाना खेडेकर, अजित वाघ, भानुदास शेळके आदींसह मोठ्या प्रमाणात वाहन चालक, मालक सहभागी झालेले होते.
हा आक्रमक मोर्चा विधानभवनावर जात असताना, मॅरीस कॉलेज पॉइंटवर हा मोर्चा अडविला. पोलीस व प्रशासनाच्या मध्यस्थीने संघटनेचे सहा पदाधिकारी यांनी विधानभवनात परिवहन मंत्र्यांकडे गेले व तेथे सविस्तर निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. आपल्या मागण्या आम्ही लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले. आज आम्ही शांत झालोत, आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आज शेकडो आलोत, यापुढे हजारोच्या संख्येने मंत्रालयात घुसू, यासाठी काही झाले तरी चालेल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशमुख यांनी दिला. या मोर्चाला विविध संघटनांनीदेखील पाठिंबा दिलेला होता.