गंगटोक (वृत्तसंस्था) – भारतीय सैन्य दलाच्या जवानांना घेऊन जाणारा लष्करी ट्रक सिक्कीममधील जेमा येथे खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात १६ जवान शहीद झाले असून, चार जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. लष्करी अधिकार्यांनी सांगितले, की एका भयानक वळणावर हा ट्रक दरीत कोसळला. या ट्रकसोबत लष्कराचे अन्य दोन वाहनेदेखील होती. ही तिन्ही वाहने सकळी चटन येथून थुंगूकडे रवाना झाली होती. दरम्यान, लष्कराच्या बचाव पथकाने चार जवानांना एअरलिफ्ट केले असून, मृतदेहांनादेखील दरीतून बाहेर काढण्यात आले होते. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
या दुर्देवी अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जखमी जवान लवकर बरे होवोत, अशी प्रार्थनाही केली आहे. तसेच, शहीद जवानांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी दोन लाखाची मदत जाहीर केली आहे. तसेच, जखमींना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी ५० हजार रूपये जाहीर केलेले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस अधिकारी व बचाव पथकाचे जवान तातडीने घटनास्थली पोहोचले होते. परंतु, तीन कनिष्ठ कमिशंड अधिकारी आणि १३ जवानांनी या दुर्घटनेत झालेल्या गंभीर जखमा व प्रâॅक्चरमुळे जागीच प्राण सोडलेले होते. चार जवानांना मात्र वाचविण्यात यश आले असले तरी, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.