BULDHANAChikhaliHead linesVidharbha

खडकपूर्णा धरणाची उंची वाढणार!

– आ. श्वेताताई महाले पाटील यांनी उपस्थित केला होता तारांकित प्रश्न
– पाणी उपलब्धतेचा अभ्यास करून खडकपूर्णा धरणाची उंची वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील – फडणवीस

चिखली (एकनाथ माळेकर) – बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा धरणाची उंची हा प्रकल्प ज्या खोर्‍यात आहे, त्या खोर्‍यातील जलसंपत्ती मालकीहक्क असलेल्या महामंडळ वा मुख्य अभियंत्यांकडून पाणी उपलब्धतेबाबत व प्रस्तावित बांधकामाविषयी सहमती आवश्यक असल्याने सहमती घेऊन धरणाची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. याबाबतचा सविस्तर अहवालास सहमती घेण्याची कार्यवाही प्रगतीत असल्याचेही फडणवीस म्हणाले.

खडकपूर्णा धरणात अतिरिक्त पाणीसाठा निर्माण करण्यासाठी या धरणाच्या दरवाजांना फ्लॅप लावून तसेच उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी तारांकित प्रश्नाद्वारे चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी केली होती. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदनदेखील दिले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिले. खडकपूर्णा धरणात फ्लॅप बसविल्यास व धरणाची उंची वाढविल्यास अतिरिक्त ९.१४६ दशलक्ष मीटर पाणीसाठा निर्माण होऊ शकतो, ही बाब सरकारच्यावतीने फडणवीस यांनी मान्य केली आहे. तसेच, याबाबत सविस्तर अहवालास सहमती घेतली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. चिखली तालुक्यातील खडकपूर्णा हा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असून, प्रकल्पाच्या एकूण प्रस्तावित २०७२० इतक्या सिंचन क्षेत्रामधून १६७३ इतके सिंचन क्षेत्र लाभधारकांच्या विरोधामुळे नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये रद्द करण्यात आलेले आहे. रद्द सिंचन क्षेत्राकरिता १.३१ दशलक्ष घनमीटर पाण्याची बचत होणार आहे. तसेच, या प्रकल्पाच्या दरवाजांना ०.३० मीटरचे फ्लॅप बसविल्यास सुमारे ९.१४६ दशलक्ष घनमीटर अतिरिक्त पाणीसाठा निर्माण होऊ शकतो, असे आ. श्वेताताई महाले पाटील यांनी राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. त्या दृष्टीने सरकारने सकारात्मक हालचाली सुरु केलेल्या आहेत.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभेतील निवेदनामुळे खडकपूर्णा धरणाची उंची वाढण्याची आशा पल्लवीत झालेली आहे. वाढीव जलसाठ्याचा उपयोग चिखली तालुक्यातील शेती समृद्ध करण्यासाठीच होणार आहे. तसेच, अनेक गावांच्या पाणी योजनांचाही प्रश्न मार्गी लागणार आहे. ०.३० मीटरचे फ्लॅप बसविणे व धरणाची उंची वाढविणे यासाठी राज्य सरकारकडून कार्यवाही सुरु झाली आहे. सरकारच्या आजच्या निवेदनावर आ. महाले यांनी समाधान व्यक्त केलेले आहे.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!