BULDHANAChikhaliVidharbha

नदीपात्रात रेती लोटून पुरावा नष्ट करण्याचा केविलवाणा प्रयत्न!

– अखेर महसूल विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे पुरावा नष्ट करण्यासाठी नदीपात्रात लोटून दिली रेती
– इसरूळच्या रेतीतस्कराला महसूल खात्यातील कोणत्या अधिकार्‍याचे अभय?

चिखली (एकनाथ माळेकर) – चिखली व देऊळगावराजा तहसीलच्या सरहद्दीवर अवैधरित्या रेती उत्खनन सुरू असल्याने त्याठिकाणी देऊळगावराजा तहसील व चिखली तहसील दोन्ही अधिकार्‍यांनी पाहणी करून अखेर उत्खननासंदर्भात नेमके क्षेत्र कुणाचे या द्विधा परिस्थितीत असल्याने, दोन्ही तहसीलचे अधिकारी अवैध रेतीसाठा जप्त न करू शकल्याने रातोरात रेती गायब करून त्या ठिकाणी असलेल्या उर्वरीत रेतीला नदीपात्रात लोटून पुरावा नष्ट केला असल्याचा केविलवाणा प्रयत्न इसरूळच्या संबंधित रेतीतस्कराने केला असल्याचे दिसून आले आहे. यानिमित्ताने कारवाईस टाळाटाळ चालवून रेतीतस्कराला वाचविण्याचा प्रयत्न महसूल खात्यातील कोणत्या अधिकार्‍याने चालविला असावा, असा प्रश्न निर्माण झाला असून, याप्रकरणाची जिल्हाधिकारी यांनी तातडीने चौकशी करण्याची मागणी ऐरणीवर आली आहे.

इसरूळ येथील ग्रामस्थांनी देऊळगावराजा व चिखली तालुक्याच्या अगदी सीमेवर असलेल्या इसरूळ येथील रेतीतस्काराबाबत पुराव्यानिशी तक्रार केली होती. हा रेतीतस्कर मोठ्या प्रमाणात नदीपात्रातून रेती उत्खनन करून शासनाला जवळपास दोन कोटीचा चुना लावला असून, त्याठिकाणी देऊळगावराजा तहसील व चिखली तहसीलचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून, त्याठिकाणी असलेला रेतीसाठ्याबाबत जप्तीची कारवाई करणार असल्याचे समजताच, या रेतीतस्कराने रातोरात त्याठिकाणी असलेला साठा गायब केला. त्यानंतरदेखील दोन्ही तहसीलचे अधिकारी त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून आलेले असतांना, सदर ठिकाणी असलेली थोडीफार रेती त्या रेतीतस्कराने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नदीपात्रात लोटून दिली. तरीदेखील अद्याप त्या रेतीतस्करावर अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई न झाल्याने त्याला कुणाचे अभय आहे, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. या रेतीतस्कराकडून गुंडप्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून, गावकर्‍यांवर दबाव टाकत, दहशत निर्माण करून पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न केला गेला असल्याचे स्पष्ट होत असून, महसूल विभागाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी पुढे आली आहे. अन्यथा, चिंचखेड, इसरूळ येथील ग्रामस्थ तीव्र आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
——————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!