बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – एकीकडे शहरात दिवाळी धामधुम सुरु असताना दुसरीकडे, नुकसान भरपाई न मिळाल्याने शेकडो शेतकरी अर्धनग्न होत बुलढाण्यात विषाची बाटली हातात घेऊन धरणे आंदोलनास बसले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
बुलढाण्यासह परतीच्या पावसाने राज्यात विविध ठिकाणी सोयाबीन, कापूस व इतर खरिप पिकांची नासाडी केली आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. परंतु, त्याला राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे सकारात्मक प्रतिसाद देत नाही. तसेच, झालेल्या नुकसानीची अद्याप भरपाई नाही. दिवाळी सणदेखील कडू जात आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा व नुकसान भरपाई मिळावी, या मागण्यांसाठी शेतकर्या बुलढाण्यात अर्धनग्न होत, हातात विषाची बाटली घेऊन धरणे आंदोलन केले. एकीकडे दिवाळी गोडधोड साजरी होत असताना, शेतकर्यांनी केलेल्या या आंदोलनामुळे प्रत्येकाच्या हृदयात कालवाकालव झाली होती. जिल्हा प्रशासन व राजकीय नेत्यांनी मात्र या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे.
—————