गर्दीतून कुणी तरी म्हणालं, ‘साहेब या वयात फिरू नका’!; शरद पवार म्हणाले, ‘मी काय म्हतारा झालोय का’?
– पुणे जिल्ह्याच्या दौर्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना दिला धीर!
जेजुरी, जिल्हा पुणे (शशिकांत पवार) – जेजुरीच्या सहकर्यांनी सांगितले, बाहेर फिरु नये. त्यांना वाटते मी म्हातारा झालो. कुणी सांगितले मी म्हातारा झालो, तुम्ही काय बघितलं? मी म्हातारा झालो नाही, असे म्हणताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या कार्यक्रमात एकच हशा पिकल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर पवारांनादेखील स्वत:च्या वक्तव्यावरून हसू आवरले नाही. त्यावेळी त्यांनी भाजपवरदेखील निशाणा साधला. शरद पवार हे पुरंदर तालुक्याच्या दौर्यावर असताना, जेजुरी येथे शेतकर्यांशी संवाद साधला. त्यावेळी एका कार्यक्रमात बोलताना एका शेतकर्याने पवार यांना बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला. त्यावर शरद पवारांनी असे मिश्किल उत्तर दिले.
राज्यात अतिवृष्टीने शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आले असताना, सत्ताधारी ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाहीत. अशा कोंडीत सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचा दौरा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ऐन दिवाळीत पुणे जिल्ह्याचा दौरा सुरू केला. या दौर्यात ‘साहेब, या वयात बाहेर फिरू नका’ असा सल्ला देणार्यांना त्यांनी ‘कोण म्हणतो मी म्हातारा झालो? असा सवाल केला. या दौर्याने पवार हे राज्य सरकारविरूद्ध पुन्हा सज्ज झाल्याचे दिसून आले.
शेतकर्यांशी संवाद साधताना पवार म्हणाले, माझ्याकडे केंद्रीय कृषिमंत्रिपदाची सूत्रे होती, त्यावेळी शेतकर्यांची ७२ हजार कोटींची कर्जमाफी आम्ही केली होती. राज्यांना व्याजाचा दर कमी करण्याच्या सूचना केल्या होत्या. कधी कधी मला गंमत वाटते, वर्तमानपत्रात राज्य सरकारने निकाल जाहीर केला. गेल्या १० वर्षात भूविकास बँकेचे कर्ज कुणाला मिळालंय का? ती अस्तित्वात आहे का?, असा सवाल शरद पवार यांनी केला. भूविकास बँक एकेकाळी होती आता तिचे नाव नाही. २५ ते ३० वर्ष झाली कुणी वसुलीला जात नाही. जी वसुलीला जात नाही, जी वसुली होणार नाही, हे कळल्यानंतर जाहीर करुन टाकले की आम्ही सगळे कर्ज माफ केले. हे म्हणजे लबाडाच्या घरचं आवताण जे असतं जेवल्याशिवाय खरं नसतं, तसे या भाजपवाल्यांचे आवताण आहे, असा टोला शरद पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कर्जमाफीवर हाणला. त्यामुळे खर्या अर्थाने संकटग्रस्त शेतकर्यांना मदत करायची असेल तर नियम बाजुला ठेऊन माणूस म्हणून निर्णय घ्यायला बसतो. राज्यकर्ता ज्या शेतकर्याचे पीक संकटात आले आहे, ज्याचा संसार उघड्यावर आलाय त्या माणसाचा चेहरा समोर असला पाहिजे, ते लक्षात घेऊन निकाल घेतला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.
भाजप आणि मनसेने ‘मिशन बारामती’ हे लक्ष्य केल्यावर पवार यांनी आतापर्यंत त्यांच्या शैलीत एखाद्याला शिरगणतीत न धरणारी प्रतिक्रिया देण्याव्यतिरिक्त ‘मिशन बारामती’ला गांभीर्याने घेतलेले नाही. मात्र, राज्य सरकार अतिवृष्टीनंतरही शांत असलेले बघून, शेतकर्यांचा जाणता राजा अशी प्रतिमा असलेल्या पवारांमधील संघर्ष करणारा नेता जागा झाला. राज्य सरकारच्या धोरणाविरूद्ध रान उठविण्यासाठी पवार यांनी पुन्हा एकदा शेतकर्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. त्यांनी पुणे जिल्ह्यापासून सुरुवात केली असून, पुरंदरमध्ये शेतकर्यांचा मेळावा घेऊन संघर्षाला आरंभ केला आहे.
—————-