– आणखी दोन बंद डीपी चालू करण्यासाठीही प्रयत्न करावेत, ग्रामस्थांची मागणी
चिखली (एकनाथ माळेकर) – साखरखेर्डा येथील विद्युत रोहित्र ७ ऑक्टोबरला जळाल्याने बहुतांश घरे अंधारात गेली होती. परंतु, मुख्यमंत्री शिंदे गटाचे युवा तालुकाप्रमुख संदीप मगर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ रिंढे यांनी तातडीने हालचाली केल्यानंतर, व महावितरणशी संपर्क साधून बारा तासाच्या आत डीपी आणली व लाईन सुरु झाली आहे. आता साखरखेर्डा गावातील आणखी दोन डीपी बंद आहेत, त्यादेखील याच वेगाने सुरु करून घेण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि लवकरच नगरपालिका होण्याच्या मार्गावर असलेल्या साखरखेर्डा येथे ७ ऑक्टोबरला रात्री विद्युत रोहित्र (डीपी) जळाले. गणपती चौकातील गावठाणाची ही डीपी रात्री दहा वाजता जळाली होती, याची माहिती शिंदे गटाचे युवा तालुकाप्रमुख संदीप मगर यांना मिळताच, त्यांनी ताबडतोब साखरखेर्डा महावितरण कंपनीचे अभियंता कुणाल डोळे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला. तसेच साखरखेर्डाचे लाईनमन चेतन राजपूत यांच्याशी संपर्क साधून डीपी जळाली आहे, याची माहिती दिली. मगर यांनी आपल्या पदाचा वापर करून बुलढाणा येथील महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून लवकरात लवकर डीपी कशी येईल, आणि साखरखेर्डा वासीयांचा जो त्रास आहे तो कमी कसा होईल, यावर आपला भर दिला. यासाठी सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ रिंढे यांनीसुद्धा संदीप मगर यांना मदत केली. या दोघांच्या प्रयत्नांना यश येत, अखेर १२ तासांमध्ये डीपी आल्यामुळे पाण्याची टाकीपासून गणपती चौकापर्यंतच्या लोकांना लाईन सुरु झाली.
या गावातील आणखी दोन डीपी बंद आहेत. परंतु त्या अजूनपर्यंत आल्या नाहीत, त्या आणण्यासाठीदेखील संदीप मगर यांनी असेच तातडीचे प्रयत्न करावेत, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
—————–