चिखली (विशेष प्रतिनिधी) – बुलढाणा ते चिखली मार्गावरील भगिरथ कारखान्याजवळ बुलढाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेचे माजी पोलिस अधिकारी विनोद पाटील यांची दुचाकी व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात विनोद पाटील हे मृत्युमुखी पडलेले आहेत. या अपघातानंतर ट्रक चालक स्वतःहून बुलढाणा पोलिस ठाण्यात हजर झाला. अपघात झाल्यानंतर हा ट्रकचालक अनेकांना पोलिस ठाण्याचा पत्ता विचारत होता. त्याने ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शीदेखील संवाद साधला. दुचाकीस्वाराला वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, ते सरळ ट्रकवर आले, असे या चालकाने सांगितले.
बुलढाणा पोलिस दलात आर्थिक गुन्हे शाखेतून विनोद काशिनाथ पाटील (वय ५५), रा. सुंदरखेड, बुलढाणा यांनी दोन महिन्यापूर्वीच सेवानिवृत्ती घेतली होती. ते मूळचे मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील रहिवासी होते. आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बुलढाणा शहराबाहेरील भगिरथ कारखान्याजवळून जात असताना, त्यांचा व ट्रकचा अपघात झाला. या अपघातात ते मृत्युमुखी पडले. याबाबत ट्रक चालकाने स्थानिकांना पोलिस ठाणे कुठे आहे, हे विचारले. तसेच, घटनास्थळाहून तो मेरा खुर्दपर्यंतदेखील आला होता. तेथे त्याला पंढरी काळे व गजानन दिलवाले या ग्रामस्थांनी बुलढाणा पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, तो बुलढाणा पोलिस ठाण्यात हजर झाला.
समोरील मोटारसायकल ही वेगात होती. त्यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तरीदेखील अपघात झाला, असे या ट्रक चालकाने ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला सांगितले आहे. तो मध्यप्रदेशातील असल्याचेही त्याने सांगितले. अपघात झाल्यानंतर विनोद पाटील यांना बुलढाणा येथील संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हा अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाने आपले वाहन बाजूलाच उभे केले व जमाव मारहाण करेल, या भीतीने तेथून पळ काढला. त्यानंतर मेरा खुर्दपर्यंत येऊन त्याने नागरिकांना पोलिस ठाणे कुठे आहे, याची विचारणा केली. तेव्हा, त्याला काही ग्रामस्थांनी बुलढाणा पोलिसांत हजर होण्यास सांगितले. त्यानुसार, तो स्वतःहून पोलिसांत हजर झाला. विनोद पाटील यांच्या पश्च्यात पत्नी, मुलगा, मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.