नंदुरबार : (जिल्हा प्रतिनिधी)जिल्ह्यात 11 ते 14 जून दरम्यान जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या मान्सूनचे आगमन झाले असून आतापर्यंत केवळ 47 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद कृषी विज्ञान केंद्राने वर्तवली आहे. पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत आहे.
मान्सूनचा जून महिना अर्धा संपल्यानंतरही दमदार पावसाने हजेरी न लावल्याने पेरण्या खोळंबल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आतापर्यंत झालेला पाऊस अत्यंत कमी असून शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी घाई करू नये 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यावरच पेरण्या कराव्या.जेणेकरून दुबार पेरणीचे संकट टळेल असा सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. नंदुरबार जिल्ह्यात यंदा कापूस मिरची आणि पपई पिकाच्या लागवडीत वाढ होण्याची शक्यता आहे मात्र वरून राजा वर सर्वस्वी अवलंबून आहे.
*पेरणी पूर्व मशागतीची कामे संपली*
बळीराजाने खरीप हंगामासाठी पेरणी पूर्व मशागतीची कामे आटपून काही शेतकऱ्यांनी बी– बियाणे ही खरेदी करून वरूण राजाकडे आस धरली आहे. मात्र अद्यापही पेरणी योग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडत आहे. दमदार पावसाअभावी मे महिन्यात लागवड केलेल्या कपाशी उत्पादक शेतकरी चिंतातुर झाले आहे. कूपनलिका आणि विहिरींच्या जल पातळीत कमालीची घट झाली आहे. तसेच काही प्रमाणात तापमानातही वाढ झाल्याने मे महिन्यात लागवड केलेली कपाशी,पपई, केळी पिकांवरही परिणाम दिसून येत आहे. यामुळे शेतकरी जोरदार पावसाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे.