– ग्रामपंचायत सदस्याकडून सीईओंकडे तक्रार दाखल, गैरहजेरी व आर्थिक अनियमिततेतीची चौकशी करण्याची मागणी
चिखली (विशेष प्रतिनिधी) – सतत दांड्या मारणार्या अंत्री खेडेकर येथील ग्रामविकास अधिकारी विवेक काळे यांनी ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांना अशोभनीय भाषेत उत्तर दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या सदस्य महिलेने याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे काळे यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. काळे यांच्या सतत गैरहजेरीची व आर्थिक अनियमिततेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्या उषा राम माळेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केलेली आहे. काळे यांना माळेकर यांनी फोन केला असता, ”मी सुट्टीवर आहे. तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, माझे कुणी काही वाकडे करू शकत नाही”, अशा अतिशय उर्मट व अशोभनीय भाषेत काळे बोलले, अशी माहिती माळेकर यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला दिली आहे.
ग्रामपंचायत सदस्या उषा राम माळेकर यांनी अंत्री खेडेकरचे ग्रामविकास अधिकारी हे सतत गैरहजर असतात, व आर्थिक व्यवहारांमध्ये अनिमितता केल्याची चौकशी करणेबाबत अर्ज सादर केला आहे. सदर ग्रामविकास अधिकारी विवेक काळे यांना फोन केला असता, मी सुट्टीवर आहे, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, माझे काही होत नाही, माझं कोणी काही वाकड करू शकत नाही, अशी उर्मट व अशोभनीय भाषा काळे यांनी वापरली आहे. मी एक महिला सदस्य असून, अशा भाषा वापरून ग्रामविकास अधिकारी यांनी अशोभनीय वर्तन केलेले आहे. या ग्रामविकास अधिकार्यांनी गावातील कोणतेही काम व्यवस्थित केलेले नाही, तसेच आर्थिक व्यवहारांमध्ये घोटाळा दिसून येत आहे, तरी त्यांच्या कामकाजाची चौकशी करून ग्रामविकास अधिकारी विवेक काळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच गावामध्ये वॉर्ड नंबर दोनमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे, व विशेष म्हणजे अंत्री खेडेकरचे ग्रामविकास अधिकारी हे बुलढाण्याहून अंत्री खेडेकर येथे जाणे येणे करून मुख्यालयी राहण्याचा नियम मोडित काढत आहेत. तसेच, अनेकदा तर ते येतच नाही, व या गावाचा कारभार चाळीस ते पन्नास किलोमीटर दूर बुलढाण्यावरून पाहतात, हे विशेष बाब म्हणावी लागेल. ग्रामविकास अधिकारी गावामध्ये एक एक महिना येत नाहीत, जर सुट्टीवर आहेत तर गट विकास अधिकारी यांनी पर्यायी ग्रामसेवक अंत्री खेडेकरला कोण दिला होता, याचीसुद्धा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्या उषा राम माळेकर यांनी केलेली आहे.
——————-