– सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्याबद्दल गावात तीव्र संतापाची लाट
शेंदुर्जन (प्रतिनिधी) – सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगाव या गावाच्या विकासाचा खेळखंडोबा झाला असून, गावाच्या नाल्या ओसांडून वाहात असून, घाण पाणी गावात रोगराई निर्माण करत आहे. तसेच, पथदिवे बंद असून, गावात अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे. तेव्हा, ग्रामपंचायत व ग्रामविकास अधिकारी यांनी तातडीने नाल्या साफ करून घ्यावेत, व पथदिव्यांवरील लाईट लावून चालू करावे, अन्यथा लक्षवेधी लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा गणेश भास्कर बंगाळे यांच्यासह ग्रामस्थांनी दिलेला आहे.
याबाबत गणेश बंगाळे यांनी ग्रामविकास अधिकारी यांना आंदोलनाची नोटीस दिली आहे. या नोटीसमध्ये नमूद आहे, की दरेगावमध्ये पथदिवे बंद असून, गावात अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. तसेच, नाल्यांची स्वच्छता झालेला नाही, नाल्या तुंबलेल्या आहेत. नाल्यांतील खराब पाणी गावात रस्त्यांवरून वाहते. त्यामुळे सर्व ग्रामस्थ त्रस्त आहेत. तसेच, गावात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. गेले सहा ते सात महिने झालेत, गावातील पथदिव्यांवरील लाईट बंद आहेत. सद्या पावसाळ्याचे दिसून असून, ग्रामस्थांच्या जीवितास सरपटणार्या प्राण्यांपासून धोका आहे. तसेच, साखरखेर्डा, दरेगाव परिसरात चोर्यांचे प्रमाण वाढलेले असून, दरेगाव येथे यापूर्वी दरोडादेखील पडलेला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी तातडीने गावातील नाल्या साफ करून घ्याव्यात व गावातील खांबांवरील पथदिवे चालू करून द्यावेत. अन्यथा, लाक्षणिक उपोषण आंदोलन केले जाईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल, असा इशाराही गणेश बंगाळे यांनी ग्रामविकास अधिकारी, दरेगाव यांना लेखी नोटीसद्वारे दिलेला आहे.
गावाची अवस्था ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवकाच्या दुर्लक्षाने बकाल झालेली असून, गावात चोहीकडे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्याने गावात अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. गावात घाण वास पसरला असून, पावसाळ्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. लहान मुले व वृद्ध ग्रामस्थ यांना अनेक साथीचे आजारदेखील होत आहे. त्याबद्दल गावातून सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याबद्दल तीव्र संताप लोकं व्यक्त करत आहेत.
—————–