– मंत्रालयात वशिला असल्याने जिल्हा परिषद शिक्षकांचा मनमानी कारभार?
पैठण (शिवनाथ दौंड) – औरंगाबाद तालुक्यातील पिंप्रीराजा केंद्राअंतर्गत असलेल्या घारेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक सतत गैरहजर राहत असल्याने संतप्त झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व पालकांनीच आज (दि.२२) शाळेला कुलूप ठोकले. येथील शाळेच्या मुख्याध्यापकाची गैरवर्तणूक थांबून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी त्रस्त ग्रामस्थांनी केली आहे.
या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिली ते इयत्ता ८ वीपर्यंतचे वर्ग असून, १७५ विद्यार्थी शिक्षण घेतात. तसेच त्या विद्यार्थांना शिकविण्यासाठी आठ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यरत असलेल्या शिक्षकांचा अंतर्गत वादाचा फटका विद्यार्थांना बसत असल्याचा आरोपही पालकांनी केला असून, शिक्षकांच्या या अंतर्गत वादातून अनेक शिक्षक गैरहजर राहत असल्याने संतप्त झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्यांनी व ग्रामस्थांनी या शाळेला कुलूप ठोकले आहे. मुख्याध्यापक कारभारी घुगे हे या शाळेवर रुजू झाल्यापासून शाळेची गुणवत्ता अतिशय ढासळली आहे. शाळेवर नियमित न येणे, आले तर उशिरा येणे, शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्यांशी अरेरावी करणे, त्यांनी काही विचारले तर आरडाओरड करून गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना पूर्व कल्पना न देता, त्यांच्या परवानगीशिवाय रजेवर जाणे, शाळेचा रेकॉर्ड नियमित अपडेट न ठेवणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या नियमित मासिक बैठका न घेणे, शैक्षणिक गुणवत्तेची चौकशी केली तर उडवाउडवीची उत्तरे देणे, गैरहजर असतानादेखील दिशाभूल करून नंतर हजेरी पटावर स्वाक्षर्या करणे, शालेय निधीचा गैरवापर करणे आदि प्रकार या ठिकाणी घडत असल्याने संतप्त सदस्यांनी आज निर्णायक पाऊल उचलले.
आठ पैकी तीन शिक्षक आज शाळेत आले नसल्याने पालकांनी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बळीराम लहाने यांच्याशी संपर्क करून उपस्थित पालकांनी मुख्याध्यापक कारभारी घुगे यांच्याशी फोनवर संपर्क करून विचारले असता, ‘माझा हात दुखत असल्यामुळे मला शाळेत येता येणार नाही असे कारण सांगून फोन कट केला’. हजेरीपट दाखविण्याबाबत प्रभारी केंद्रप्रमुख रियाज शेख यांच्याकडे ग्रामस्थांनी मागणी केली, तेव्हा इतर उपस्थित शिक्षक व केंद्रप्रमुखांनी आरडाओरड करून कार्यालयात गोंधळ घालून, उलट ग्रामस्थांनाच गुन्हा दाखल करण्याची धमकी रियाज शेख यांनी दिली. सतत गैरहजर राहत असलेल्या शिक्षकांचा वशिला मंत्रालयात असल्यामुळे ते मनमानी कारभार करत असून, आमच्या मुलांचे नुकसान होत आहे. जर त्यांना कोणी काही विचारले तर गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे, आरडाओरड करणे यामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत. मुख्याध्यापक कारभारी घुगे यांची ताबडतोब येथून बदली करून त्यांच्या आर्थिक गैरकारभाराची चौकशी करावी, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व पालकांनी केली आहे. याप्रसंगी श्रीराम तांबे उपसरपंच, बळीराम लहाने शालेय समिती अध्यक्ष, विक्रम कतारे, अनिल काजळे, सोमीनाथ गव्हाणे, गणेश लहाने, सचिन गव्हाणे, रामेश्वर कतारे, गणेश गव्हाणे, कनात कुलकर्णी, विजय लहाने, बबन ठोंबरे, संजय गलधर, मदन गव्हाणे, विजय, थॉम वाघमारे, किशोर वीर, विश्वास वाघमारे, किशोर वाघमारे, सुनील वाघमारे, शिवाजी कतारे व गावातील सर्व नागरिक हजर होते.
शाळेत शिक्षक शिकवत नाही, शिक्षणाचा दर्जा कमी होत चालला आहे, मुले आठचा पाढा म्हणायला सांगितला तर आठ नववे बासस्ट म्हणतात. खूप वाईट आहे.
– श्रीराम तांबे, माजी उपसरपंच घारेगाव
—————-