BULDHANAKhamgaon

”ठाण्याचा पोपट काय म्हणतो, वेदांता प्रकल्प गुजरातला नेतो!”

– शेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार देण्याची मागणी
– वेदांता प्रकल्प परत आणा, यासह विविध मागण्यांसाठी जोरदार आंदोलन

शेगाव (तालुका प्रतिनिधी) – शेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत तातडीने द्या, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्यावतीने शेगाव येथे महिला आघाडी प्रदेश सचिव सौ. नंदाताई पाऊलझगडे यांच्या नेतृत्वात रस्ता रोकोसह जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाण्याचा पोपट काय म्हणतो, वेदांता प्रकल्प गुजरातला नेतो, पन्नास खोके, एकदम ओके, यासह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले. यावेळी आंदोलकांनी शेगाव तहसीलदार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय द्या म्हणत, राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश सचिव सौ.नंदाताई पाऊलझगडे यांच्या नेतृत्वात शेगाव येथे विविध मागण्या घेऊन रस्ता रोको व धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या, वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात पुन्हा वापस आणावा, संजय गांधी योजनेतील २५ वर्षाच्या मुलांची अट रद्द करण्यात यावी, पीएम किसन योजनेचा हप्ता शेतकर्‍याच्या खात्यात त्वरित जमा करावा, जीवनावश्यक वस्तूंवरील भाव कमी करून जीएसटी कमी करावी, यासह विविध मागण्यांसाठी आज हे आंदोलन करण्यात आले. यावेळी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक शेगाव येथे शेकडो कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करून आपला रोष व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय गव्हांदे, शहर अध्यक्ष दिनेश साळुंके, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष भूषण दाभाडे, माजी शहर अध्यक्ष मनोज शर्मा, नितीन कराळे यांच्यासह सर्वच पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते आणि परिसरातील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!